पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] जिल्ह्यातील दौंड तालुक्यात गेल्या काहीच दिवसापूर्वी भीमा नदीत सात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका मोठ्या हत्याकांडाचा उलघडा केल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता.ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तिस वर्षीय युवकाची निर्दयी हत्या करुन शिर नसलेल्या शरीराचे पाच तुकडे एका प्लास्टिक पिशवीत भरुन इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडीत भिमा नदीपात्रात आढळून आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भीमा नदीत पाच तुकडे केलेला मृतदेह आढळला. या ३० वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करुन त्याचे पाच तुकडे करत शीर विरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत भरुन नदीपात्रात टाकण्यात आला आहे.या घटनेची माहिती समजताच भिगवण पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून या रहस्यमय क्रुर खूनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली असुन वरिष्ठांकडून तपासाच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
