अहमदनगर [हवेलीनामा वृत्तसमुह] नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला असून सत्यजित तांबेंच्या मदतीला आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उभे राहिले आहेत.त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नाराजी बोलून दाखवली. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे नाट्य घडलं त्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्याची नाराजी उफाळून येत आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती.
याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर पक्षासह राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला.
