पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शाळेत शिस्त ठेवण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला फटकारणे वा योग्य शिक्षा देणे हा प्रकार कोणत्याही गुन्ह्यांच्या कक्षेत येत नाही.त्यांना शिस्तप्रिय बनवण्यासाठी ही एक सामान्य बाब आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नुकताच दिला. एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपल्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांना छडीने मारहाण केल्याचा आरोप ठेवत कनिष्ठ न्यायालयाने एक दिवसाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. सुमारे चार वर्षांनंतर हा निकाल फिरवत गोवा खंडपीठाने वरील निर्वाळा दिला.

न्यायाधीश भरत देशपांडे यांच्या एकल खंडपीठाने म्हटले की, प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिस्त लावणे आणि त्यांच्यात चांगल्या सवयी विकसित करण्याच्या प्रामाणिक हेतूने शिक्षकांना अनेकदा कठोर भूमिका घ्यावी लागते. प्राथमिक शाळांमध्ये ही एक सामान्य बाब असून तो कोणताही गुन्हा नाही. शिक्षणासोबतच जीवनातील मुल्य आणि नैतिक बाबी आत्मसात करण्यासाठी मुलांना विद्यार्थ्यांच्या रूपात शाळेत पाठविण्यात येते. शाळेचा उद्देश फक्त अभ्यासक्रमांतील विषयांना शिकविणे नसून, त्यांना भविष्यात एक चांगला व्यवहार्य सक्षम नागरिक बनविणे आहे, असेही एकल खंडपीठाने स्पष्ट केले.

ही घटना 2014 मधील असून, संंबंधित शिक्षकावर शाळेत दोन बहिणींना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यात एक पाच तर, दुसरी आठ वर्षांची बहीण होती. लहान बहीण तिच्या बॉटलमधील पाणी संपल्याने वर्गातील अन्य एका विद्यार्थिनींच्या बॉटलमधील पाणी प्यायली. यानंतर मोठी बहीण तिला पाहण्यासाठी तिच्या वर्गातून आल्याने शिक्षकाने दोघींनाही मोजपट्टीचा वापर करीत मारले होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *