पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहर पोलीसात सहायक पोलिस निरीक्षक (शिघ्र कृती दल) पदावर कार्यरत असलेले संभाजी गुरव यांनी नुकतीच दक्षिण अमेरिकेतील ‘माउंट अकोनकागुआ’ची चढाई पूर्ण केली. त्यांनी याअगोदर सन २०२१मध्ये जगातील सर्वोच्च ‘एव्हरेस्ट’ शिखर सर केले आहे. त्यानंतर त्यांनी सातही खंडांतील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचा निश्चय केला होता.
आतापर्यंत गुरव यांनी युरोपातील ‘एल्ब्रुस,’ आफ्रिका खंडातील ‘किलिमांजरो,’ ऑस्ट्रेलियातील ‘कोजिऑस्को’ ही शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यानंतर, त्यांनी आता अर्जेंटिनातील अँडीज पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर असलेल्या ‘अकानकागुआ’वर २२ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता यशस्वी चढाई केली. समुद्र सपाटीपासून या शिखराची उंची २२ हजार ८३८ फूट आहे.त्यांनी बेस कॅम्पवरून २० जानेवारी रोजी चढाई सुरू केली. कॅम्प दोनवर मुक्काम केल्यानंतर २२ तारखेला शिखराच्या दिशेने पुढचा प्रवास चालू केला. साधारण साडेबारा तासांच्या मेहनतीनंतर चौदाशे मीटर उंची चढून हे शिखर सर केले.
या साहसी चढाई बद्दल अनुभव सांगताना गुरव म्हणाले की, ‘दरवेळेला या काळात हा पर्वत कोरडा असतो. मात्र, या वेळी येथे मोठी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे अंग गोठवणारी थंडी होती. साधारण उणे वीस अंशांपर्यंत तापमान होते; तसेच हा पर्वत महासागरांच्या मध्ये असल्याने खूप वेगाने वारा वाहतो. त्यामुळे आम्ही कॅम्प तीनवर न थांबता थेट शिखर गाठण्याचा निर्णय घेतला. आम्ही तेथून साडेबारा तासांत चौदाशे मीटर उंचीवरील शिखर सर केल.’
या मोहिमेपूर्वी कात्रज ते सिंहगड पायथा असा सातत्याने सराव केला; तसेच, दहा-पंधरा किलो वजन घेऊन डोंगर चढण्याचा सराव केला होता. त्याचा मला खूप फायदा झाला,’ असेही गुरव यांनी सांगितले. आता अमेरिकेतील डेनाली (६१९० मी.) आणि अंटार्क्टिकातील व्हिन्सन मॅसिफ (४८९२ मी.) ही शिखरे वर्षअखेरपर्यंत सर करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी मेहनत घेत असल्याचे गुरव म्हणाले.
