पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सिंहगड पोलिस ठाण्याच्या परिसरात पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर मंगळवारी भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. सनसिटी सोसायटीसमोर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनसिटी सोसायटीसमोर ऑटो सर्विसेसचे दुकान आहे. या दुकानाजवळ संतोष पवार नावाच्या व्यक्तीने अंगरक्षकाची पिस्तूल घेऊन त्यातून चार राउंड फायर केले. त्यात रमेश बद्रिनाथ राठोड याच्या पायावर दोन गोळ्या लागल्या. त्यात रमेश गंभीर जखमी झाला आहे. त्याला सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी घाबरून पळ काढला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.
कल्याणीनगरमध्येही सोमवारी रात्री एका व्यावसायिकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
