पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कोल्हापूर मध्ये बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आतापर्यंत सहा जणांना अटक केली त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. भुदरगड पोलिसांनी आणखी एक एजंटाला अटक केली आहे. सर्जेराव अशोक पाटील (वय- ३२ रा.शिरसे, ता. राधानगरी) हे त्याचे नाव आहे. आत्तापर्यंत याप्रकरणी मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करत असल्या प्रकरणी मडिलगे खुर्द येथील विजय कोळस्कर यास मंगळवारी पकडले. कोळस्कर याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी पाठविणाऱ्या एक डाॅ. बाबुराव दत्तू पाटील (रा. बामणे) व सागर शिवाजी बचाटे (रा. सोनाळी, ता. कागल), तिटवे (ता. राधानगरी) येथील दिगंबर मारुती किल्लेदार व नर्स शीला शामराव माने या चौघांना अटक केली. शनिवारी रात्री सर्जेराव अशोक पाटील यास अटक केली. हे पाचही पैसे घेऊन गिर्हाईक तपासणीसाठी पाठवत होते. तपासणीनंतर गर्भपात करण्याची जबाबदारी शिला माने करत होती.
बोगस डॉक्टर विजय कोळसकर हा गेली कित्येक वर्षे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा गोरख धंदा करत होता. त्याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी पाठविणाऱ्या एजंटांची मोठी साखळी असल्याची चर्चा आहे.
