पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) खेड तालुक्यात तब्बल 1 हजार 784 हेक्टर पोटखराब क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रामध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. यामुळे शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ बरोबर अधिक पीक कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पोटखराब क्षेत्र लावगडीयोग्य क्षेत्रात रुपांतर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

ब्रिटिश काळापासून राज्यातील ब-याच शेतकऱ्यांच्या सातबा-यावर पोटखराब क्षेत्र असा उल्लेख करण्यात आला आहे. यात बहुतेक शेतक-यांनी आपली पोटखराब जमीन मेहनत करून लागवडीयोग्य बनवली आहे. तरीही शासकीय दप्तरात, सातबा-यावर अशा जमिनीची नोंद पोटखराब अशी होती परिणामी शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता.

या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने पोटखराब जमिनच्या नोंद सातबारा उतार्‍यावर ‘लागवडीयोग्य क्षेत्र’ अशी करण्याची प्रक्रिया सुरू केली. ही विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात घेण्यात आली. खेड तालुक्यात देखील ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यात तब्बल 1784 हेक्टर पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र म्हणून सातबा-यावर नोंदविण्यास आले. या सर्व शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, तसेच पीककर्ज, पीकविमा आदी लाभ मिळणार आहेत.

ही प्रक्रिया निरंतर चालणारी प्रक्रिया असून, शेतकरी यासाठी संबंधित तलाठ्यामार्फत कधीही आपले पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र करण्यासाठी अर्ज करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *