पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) शहराची महत्त्वाची वाहिनी असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एकमेव सेवा देणारी वाहतूक म्हणून ‘पीएमपी’कडे पाहिल जाते.दररोज ‘पीएमपी’कडून १६५० बसच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळ्या ३७१ मार्गांवर बससेवा दिली जाते. दिवसभरात बसमधून दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढीसाठी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. ‘पीएमपी’च्या मासिक उत्पन्नाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
उत्पन्नात वाढ होण्यास बरोबरच प्रवाशांना जलद, शाश्वत आणि वेळेवर सेवा देण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. कायमच रस्त्यावर बंद पडणाऱ्या बस कायमस्वरुपी बाद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय तोट्यातील मार्गांवरील बस कमी करून गर्दीच्या ठिकाणी संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा तर मिळतोच आहे त्याचबरोबर उत्पन्नातही वाढ होत आहे.
डिसेंबर महिन्यात बसच्या ५० हजार ५६४ फेऱ्या झाल्या यापैकी ठेकेदारांच्या बसच्या २९ हजार १८६ फेऱ्या तर २१ हजार ३७८ फेऱ्या खात्याच्या मालकीच्या बसच्या झाल्या. यामधून तीन कोटी ६९ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
