पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) शेगावमध्ये एका बंद घराचा दरवाजा तोडून सोने, चांदी,मोलवान वस्तूसह २५ लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण ९२ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली सोमवारी ही घटना उघडकीस आली. रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील मटकरी गल्लीतील रहिवासी आनंद पालडीवाल यांच्या निवासस्थानी घडली. घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले, मात्र कोणताही माग मिळाला नाही. आईची तब्येत बरी नसल्याने पालडीवाल कुटुंबीय उपचारासाठी जालना येथे गेले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी संधी साधली. ही बाब सीसी टिव्हीत कैद झाली सोमवारी सकाळी शेजाऱ्यांना पालडीवाल यांच्या घरातील वस्तूंबाबत शंका आल्याने त्यांनी ही माहिती घरमालकाला दिला. त्यानुसार आनंद पालडीवाल सोमवारी दुपारी शहरात आले. त्यांनी घरात पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.त्यामध्ये घरातील हिरे, १५०० ग्रॅम (दीड किलो) सोने, दोन किलो चांदी तसेच रोख २५ लाख रुपये असे एकूण ९२ लाख रुपयांच्या मुद्देमाल चोरी गेल्याचे नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, श्वान तेथेच घुटमळले कोणताही माग श्वानाने काढला नाही. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनीही तपासणी केली. पोलिसांनी पालडीवाल यांच्या घरासह शेजारच्या सीसीटीव्ही मधील फुटेजची पाहणी केली आतिरिक्त पोलिस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, ठाणेदार आनंद गोपाळ यांच्यासह पोलिसांचा ताफा ठाण मांडून आहे. रात्री उशिरापर्यंत शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलिसांनी पाहणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे जण मध्यरात्री १ वाजेनंतर घरात प्रवेश करीत असल्याचे नोंद झाले आहे. तसेच इतरही शेजारच्या फुटेजची तपासणी पोलिस करीत आहेत. त्याद्वारे पोलिसांना सुगावा मिळण्याची शक्यता आहे.
