पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकावला.
अंतीम सामन्यात दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. ज्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.महाराष्ट्र केसरी २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत झाली. ही अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला, अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते. पण शेवटी ६-४ अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत अंतीम सामन्यात धडक मारली. दुसरीकडे मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडली. ही लढत फारच एकतर्फी झाल्याचं दिसून आलं शिवराजनं सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवलं आणि अखेर ८-१ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत फायनल गाठली.
