पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) लंपी चर्म रोगाचा राज्यातील वाढता प्रकोप निश्चितच चिंतेत टाकणारा विषय आहे. दिवसेंदिवस लंम्पिमुळे वाढणारे गाय वर्गातील रुग्ण व वाढत चाललेली मरतूक पशुपालकांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. सद्यस्थितीत म्हैस वर्गामध्ये या रोगाची लागण झालेली नाही ही फार मोठी जमेची व दिलासा देणारी बाजू आहे.
सध्या क्षेत्रीय स्तरावर पशुवैद्यक आजारी गाईंवर उपचार करण्यात व्यस्त आहेत, तथापि शासन स्तरावरून उपलब्ध औषधातूनच आजारी जनावरांना बिनचूक उपचार करण्यात पशुवैद्यकांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या औषधातूनच आजारी जनावरांना उपचार करण्यात यावेत, पशुपालकास बाहेरील औषधे लिहून देऊ नयेत/ प्रिस्क्राइब करू नयेत असे खाते स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत. वास्तविक पाहता प्रत्येक आजारी जनावराची आजाराची स्थिती/stage/ तीव्रता एकसारखी असू शकत नाही त्यामुळे त्यांची उपचारातून बरे होण्यासाठी लागणाऱ्या औषधांची गरज अर्थातच वेगवेगळी निश्चितपणे असणार आहे. सदरहू आवश्यक औषधे ( शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत नाहीत अशी) लाखो रुपये किमतीच्या आजारी जनावराचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडणार असतील, आणि आजारी जनावराचा मालक स्वतः आपले किमती जनावर वाचवण्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यास तयार असेल तर ती वापरण्यास काहीही हरकत नसावी असे मला स्पष्टपणे वाटते.या अनुषंगाने खाते स्तरावरून स्पष्ट निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्याने देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल व योग्य रीतीने व आवश्यकतेनुसार उपचार करता येतील, परिणामी आजारी जनावरांची जीव वाचवणे शक्य होईल.
सद्यस्थितीत प्रथम प्राधान्याने गाय वर्गामध्ये 100% लसीकरण युद्ध पातळीवर व विक्रमी वेळेत पूर्ण करून घेणे फायद्याचे ठरेल. याकरिता मुबलक लस साठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी शासन सेवेतील पशुधन पर्यवेक्षक, दूध संघातील पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच खाजगी पशुवैद्यक यांची सेवा उपयोगात आणणे शक्य आहे. शासन सेवेतील पदवीधर पशुवैद्यकांच्या सेवा (L.D.O/A.C.A.H) प्राधान्याने पूर्णतः आजारी जनावरांच्या उपचारांचे कामी आणल्यास रोग नियंत्रणात आणण्यास / मरतुकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. लसीकरणाचे काम तात्काळ पूर्ण झाल्यास सदरचा कर्मचारी वर्ग (L.S.S) पूर्ण क्षमतेने पशुवैद्यकांना जनावरांचे उपचाराच्या कामी मदतनीस म्हणून उपयोगात आणता येईल. गाईंमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्याच्या अनुषंगाने लसीकरणाचा कार्यक्रम विक्रमी कमी वेळेत पूर्ण करणे फायद्याचे ठरणार आहे, ही बाब अधोरेखित करण्यात येत आहे. असे केल्याने आजारी जनावरांच्या उपचाराकरता पूर्ण वेळ देता येणे शक्य होणार आहे.
(डॉ. बी. ए. शेख)
सेवानिवृत्त उपायुक्त पशुसंवर्धन
