किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा ऑनलाईन) : लग्नाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करुन वाढदिवसानिमित्त येथील अमरज्योत चॅरीटेबल ट्रस्टच्या गॅसदाहिनी उपक्रमासाठी अकरा हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश देत या उपक्रमाप्रति कृतज्ञता व्यक्त करत येथील गुजराथी दांपत्याने आपला लग्नवाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
राजगुरुनगर शहरातील प्रा. सुरेश गुजराथी काही वर्षांपूर्वी अध्यापन क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले आहेत. समाजातील चांगल्या व सेवाभावी उपक्रमांसाठी कायम दातृत्वाची भावना असलेल्या प्रा. गुजराथी यांनी आपल्या लग्नाचा ४६ वा वाढदिवस कोणताही डामडौल न करता केवळ साधेपणाने साजरा करत, सेवाभावी वृत्तीने व कोणतेही शासकीय अनुदान न घेणाऱ्या अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या गॅसदाहिनी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या विश्वस्तांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गॅसदाहीनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कारांचे काम करत असून, यामुळे पर्यावरणाची जोपासना होत आहे. तसेच वेळप्रसंगी बेवारस मृतदेह, गोरगरीब कुटुंबातील मृतदेह यांच्यावर सामाजिक दायित्वाची भावना राखून मोफत अंत्यसंस्कार केले जातात. त्यांची ही सामाजिक जाणीव प्रशंसनीय असून त्यांच्या कामास माझा काही तरी सहभाग असावा या भावनेतून मी प्रत्येक वर्षी अशी मदत देणार असल्याचे यावेळी बोलताना प्रा. गुजराथी व त्यांच्या पत्नी मिनाक्षी गुजराथी यांनी सांगितले. याप्रसंगी राजगुरुनगरचे माजी सरपंच तथा अमरज्योत चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कासवा, विश्वस्त रविंद्र गुजराथी, छगनलाल ओसवाल, प्रा. अविनाश शिंदेकर, अॅङ गणेश होनराव, निलेश गुजराथी, रोटरी क्लबचे अविनाश कहाणे, श्रीकांत गुजराथी आदी उपस्थित होते.
