पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) थेऊर परिसरातील वृंदावन गार्डन मंगल कार्यालयाशेजारी बेवारस आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख हातावर गोंदलेल्या नावावरुन केवळ एकच तासात लाऊन संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क करुन याबाबत माहिती देण्यात आली यात महत्वाची भूमिका बजावली ती रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे यांनी,त्यांच्या या पक्षाच्या माध्यमातून असणाऱ्या ओळखी मुळे नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास थेऊर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी अमित गोरे यांना कंट्रोल मधून माहिती मिळाली की,वृंदावन गार्डन मंगल कार्यालयाजवळ एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत दिसून येत आहे यावर त्यांनी ताबडतोब त्यांचे सहकारी पोलीस हवालदार विजय जाधव व पोलीस नाईक दिगंबर जगताप यांना घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याच्या सूचना दिल्या.त्यांनी आपल्या सोबत एस पी ओ संतोष गायकवाड व भगवान शेडगे यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले असता एक व्यक्ती निपचित पडलेला असल्याचे दिसून आले त्याची ओळख पळविण्यासाठी शोधाशोध केली परंतु काहीच माहिती मिळाली नाही दरम्यान त्यास रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात घेऊन गेले.
या अनोळखी व्यक्ती संदर्भात माहिती समाज माध्यमावर टाकली त्यावर त्या व्यक्तीच्या हातावर त्यांचे नाव नीळकंठ दशरथ क्षीरसागर ता. मोहोळ जि सोलापूर असे गोंदलेले असल्याचे सांगण्यात आल्यायावर नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रिब्लिकन पक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष मारुती कांबळे यांनी आपल्या मोहोळ तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करुन त्यांना याची माहिती दिली,त्यांनी लगेच अन्य कार्यकर्त्यांकडून माहिती मिळवत ही व्यक्ती नीळकंठ नसून रावसाहेब दशरथ क्षीरसागर रा नरखेड ता मोहोळ जि सोलापूर येथील असल्याचे सांगितले.तर ते गेली दहा वर्षापासून बेपत्ता होते अशी माहिती समोर आली आहे.
नरखेडचे सरपंच विनोद बलभीम पाटील यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क केला व त्या व्यक्तींच्या नातेवाईकांना याची कल्पना दिली तसेच त्याचा एक पुतण्या पुण्यात असल्याने त्यास ससून रुग्णालयात पाठवले.हे केवळ दीड तासाच्या वेळात उलगडले.
पुढील तपास लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांचे सहकारी पोलीस नाईक दिगंबर जगताप करीत आहेत.
