मुंबई, दि. ४ : लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. या सुविधेसोबतच मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब देखील सुरू करण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला त्यामुळे बळ प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सवास आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार श्रीमती यामिनी जाधव, उप महापौर ॲड. सुहास वाडकर, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता श्री. रवी राजा, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू आदि मान्यवर उपस्थित होते.
अनेकांना दीर्घायुष्य देणाऱ्या शतायुषी नायर रुग्णालयाच्या सेवेला प्रणाम करून सर्व डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करीत शतकोत्तर वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “रेज अगेन्स्ट दि डाईंग ऑफ लाईट या डॉ.शिशिर श्रीवास्तव लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी सारख्या दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हा कोट्यावधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी वेदिका शिंदे या बालिकेचे याच आजाराने निधन झाले. तिला १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. भविष्यात या आजाराने लहान मुले दगावू नयेत म्हणून महापलिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत. त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आजपासून नायर रुग्णालयात ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरावर उपचाराची सुविधा निर्माण झाली आहे. अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून सध्या नायर रुग्णालयातील १७ रुग्णांना त्याचा लाभ होईल.
कोरोनाविरुद्धची लढाई गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्यात डॉक्टर्स, कर्मचारी खंबीरपणे लढत आहेत. या परिश्रमामुळे लाखो नागरिकांना जीवनदान देण्याचं काम झालं आहे. मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जगात मुंबई मॉडेलचे कौतुक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाचा विषाणू नवीन अवतार घेत असतो. विषाणूने बदलेला अवतार शोधून त्यावर वेळीच उपचार शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग लॅब उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अशी लॅब असणे गरजेचे होते. आजपासून ही लॅब कार्यरत होईल त्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाची वाढ जिथे जिथे होते तिथल्या विषाणूला शोधून काढणे, त्याचे जनुकीय परिणाम शोधणे गरजेचे असते. नसता अनर्थ घडतो. जेवढा विषाणूचा प्रकार ओळखण्यास उशीर तितके त्याचे परिणाम समजून घेणेही कठीण असते हे कोरोना विषाणूवरून आपणास दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सुरु झालेली जिनोम सिकवेन्सींग लॅब स्थापन करण्याची इच्छा महापालिकेने पूर्ण करून दाखवली. त्यासाठी शासन आणि महापालिकेवर आर्थिक भार न टाकता त्यांनी सीएसआर निधीतून हे काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष श्रीमती राजुल पटेल, डॉ.शशांक जोशी, डॉ.संजय ओक, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, श्रीमती राखी जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती राजराजेश्वरी अनिल रेडकर सह आयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्यासह संबंधित मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
