पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) लोकांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आपल्या स्वार्थासाठी सावकारकीच्या स्वरूपात नफेखोरीकरत आर्थिक डबुल गोळा करणाऱ्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून ही प्रकरणे हळूहळू बाहेर पडत असून उरुळी कांचन येथील अशाच एका सावकाराला पुणे पोलिसांनी गजाआड करत त्याच्याकडून एक कोटी सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टापूर येथील शेतकरी विकास रामदास कटके यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली त्यानुसार उरुळी कांचन येथील स्वप्नील कांचन,राजाराम कांचन, प्रशांत गोते व अन्य तीन अनोळखी व्यक्ती यांनी त्यांच्याकडून व्याजाने घेतलेल्या सात लाखाच्या व्याजापोटी रु.४ लाख ६० हजार रोख रक्कम घेऊन त्यांना स्वप्नील कांचन यांच्या गाडीत बळजबरीने बसवून त्यांना व कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देऊन बेकायदेशीर व्याजापोटी शिंदवणे येथील १८ गुंठे जमीन लोणी काळभोर येथील हवेली रजिस्ट्रेशन कार्यालयात नेऊन प्रशांत गोते याच्या नावे खरेदीखत करून घेतली.व कटके यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, त्याचप्रमाणे त्यांची वडिलोपार्जित जमीन नावावर करून देण्यासाठी त्यांना व कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळी पथके तयार केली आणि स्वप्नील कांचन याच्या घरात छापा टाकून त्याच्या घरातून बेहिशेबी तब्बल रु ५७,३८,५४० रोकड तर रु ४८,६२,५०० ची सोन्याची दागिने असा एक कोटी सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी स्वप्नील राजाराम कांचन यास अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता त्यास दि १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.
ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ नामदेव चव्हाण, परिमंडळ पाच च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या सहकारी यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.
