पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) आपण आपल्या परंपरांमध्ये काळानुरूप बदल करायला हवेत. वारकरी परंपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन केले जातात त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज यांच्या गाथेवरही प्रवचन होण्यास हरकत नसावी, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चाकण येथे केले.ते संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी संपादीत केलेल्या
।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाच्या ‘बा तुकोबा’ या संत तुकाराम महाराज विशेषांकाचे प्रकाशन
डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिकमहाराज मोरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, ज्येष्ठ पत्रकार संजीव शाळगावकर, महेश म्हात्रे, यमाजी मालकर,ह. भ. प. सचिन पवार, प्राचार्य पांडुरंग गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी संभाजी लोंढे, नानासाहेब लोंढे, बाळासाहेब लोंढे, ह. भ. प. मधुकर गायकवाड, हरिती पब्लिकशनचे दीपक कसाळे, हर्मिस प्रकाशनचे सुशील धसकटे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, भामचंद्र सप्ताह समितीचे सर्व पदाधिकारी, वारकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       डॉ. मोरे पुढे म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीतील चांगल्या गोष्टी घेताना आपण आपल्याकडील चांगल्या गोष्टीही विसरू नयेत. उलट त्या दोन्हींचे मिश्रण करता येईल. याचेच उदाहरण म्हणजे, १ जानेवारी या पाश्चात्य कालगणनेच्या दिवशी
।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाचे प्रकाशन तसेच,  ‘आईनाना प्रतिष्ठान’च्या वतीने ‘चला भामचंद्र डोंगरावर जाऊ, तुकोबारायांना समजून घेऊ’ हा उपक्रम होय. तुकोबारायांनीही ‘मिरासी’ हा पर्शियन शब्द अभंगात वापरला. पोर्तुगिजांनी आपल्याकडे पाव आणला. आपण त्याचा वडापाव केला. म्हणजेच आपण कालानुरुप बदलत आहोत. वैकुंठवासी निवृत्ती महाराजांनी निस्वार्थपणाने संतसेवा केली. त्यांचीच परंपरा डॉ. श्रीरंग गायकवाड आणि कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे.।।ज्ञानबातुकाराम।। हे संत साहित्याला वाहिलेले वार्षिक हे त्याचेच उदाहरण आहे. आपण अशा गोष्टींना बळ दिले पाहिजे.
यावेळी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रकाशनानंतर भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आईनाना प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.आभार प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *