थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवण्यात आली आहे.यात आढळून आलेली कुपोषित बालक ही जन्मापासून कुपोषित असल्याचे दिसून आले आहे. गर्भवती असताना बाळ व आईला योग्य पोषण आहार न मिळाल्याने ही मुले कुपोषित राहिली. ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेत आढळून आलेल्या कुपोषित मुलांवर विशेष लक्ष दिले जाणार असून स्थानिक ग्रामपंचायतींनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या मुलांना नियमितपणे अंगणवाडी सेविका पोषक आहार घरी जाऊन देणार आहेत. कुपोषित मुलांना कोणत्या पद्धतीने आहार दिला पाहिजे याची माहिती मुलांच्या पालकांना दिली जात आहे.या बालकांवर विशेष लक्ष दिल्यानंतर ही बालके सर्वसाधारण गटात येतील, अशी आशा असल्याचे मत महिला बालकल्याण विभागाने व्यक्त केले आहे.पुणे जिल्हात महिला व बालकल्याण समितीतर्फे कुपोषित बालकांसाठी शोध मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत तब्बल २५३ कुपोषित बालके आढळून आली आहेत. तर १ हजार ६०३ मध्यम कुपोषित आढळली आहे. कुपोषित बालकांना सर्वसाधारण गटात आणण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत.
