पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)    म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांची कारवाई सुरु असून मोठे मासे गळाला लागल्याची माहिती आहे. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपरही फुटणार होता,परंतु सायबर पोलिसांची सतर्कता आणि एमपीएससी समन्वय समितीने सतर्कता दाखवल्याने हे तिघे जण सापडले आहेत.

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.  या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत.ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय झाली आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी केंद्रावर जाऊ नये, गाव सोडू नये असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

या परीक्षांच्या संदर्भात काही जणांनी मध्यस्थांना पैसे दिल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे दिले असतील  ते परत घ्या, असे ट्विट देखील आव्हाड यांनी केले आहे. ”म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत” असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *