थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरून जनजीन पुन्हा पूर्ववत होत असताना पुन्हा जगावर ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटच्या आगमनाने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील देशातून जगातील अनेक देशात फैलाव होत असलेल्या ओमिक्रॉनला रोखण्यासाठी प्रशासन सर्तक झाले आहे. कोरोनाच्या नियमांमध्ये करण्यात आलेली शिथिलता पुन्हा कडक करण्यात आली आहे.
राज्य सरकार व स्थानिक प्रशासन सर्तक झाले असून शहरात कोरोनाबाबत घालून देण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन येत्या ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी केलं आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अनुयायांनी शांतता प्रस्थापित करुन मागील वर्षीच्या धर्तीवर साजरा करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना महापरिनिर्वाण दिन साजरा करता आला नाही. यावर्षी कोरोना संक्रमणाचा वेग खाली आल्याने आंबेडकरी अनुयायी महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला लागले होते. मात्र नव्याने दाखल झालेल्या ओमिक्रॉन संकटामुळे अनुयायांच्या आनंदावर विरझन पडणार आहे.यंदा ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता मागच्याप्रमाणे यावर्षी महापरिनिर्वाण दिन साजरा करावा. यावेळी घालून दिल्या जाणाऱ्या शासकीय नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी केले आहे.
