आळंदी देवाची (हवेलीनामा ऑनलाइन) “ज्ञानोबा माउली…. तुकाराम” हरिनामाच्या गजरात द्वादशी निमित्त माउलींचा चांदीचा मुखवटा रथोत्सवात ठेवून हरिनाम गजरात गोपाळपुरातून निघाला. रथोत्सवात दिवसभर आळंदीत पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. उद्या गुरुवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे.
या प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील , व्यवस्थापक माउली वीर, श्रीचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, रामभाऊ चोपदार, मानकरी साहिल बाळासाहेब कुऱ्हाडे , मंगेश आरू, योगेश आरु, अनिल कु-हाडे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, श्रींचे मानकरी, देवस्थांनचे कर्मचारी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
वारकरी भाविकांनी भक्तिमयरसात चिंब होत रथोत्सवात श्रींचे दर्शन घेतले. रथोत्सव प्रसंगी पोलिस बंदोबस्त तैनात होता. आज दिवसभर अवकाळी पावसाने सोहळ्यातील नागरिक आणि व्यापा-यांची काही वेळ तारांबळ झाली. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेल्या पाण्याने रहदारीला विलंब झाला. दरम्यान काही दिंड्यानी पावसात भिजत प्रदक्षिणा पूर्ण केली. पथारी व्यवसाय व्यापार्यांचे या पावसाने नुकसान झाले. दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने रस्त्यावर वर्दळ कमी राहिली. मात्र मठ, मंदिरे, धर्मशाळा येथे हरिनाम गजर सुरू राहिला. यात्रेत दुकानांतून गर्दी मात्र होत राहिली. रस्त्यांचे दुतर्फा उभे राहून श्रींचे रथोत्सवात ग्रामस्थ, भाविकांनी दर्शन घेतले. श्री राधाकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा झाली. परिसरातून आलेले भाविक, वारकरी, दिंडीकरी श्रींचे रथोत्सवात सहभागी झाले होते. श्रींची पूजा होताच माउलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणेसाठी पुष्प सजावट केलेल्या रथात ठेवण्यात आला.ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक मार्गे हरिनाम गजरात झाली. मंदिरात या सोहळ्याची सांगता झाली. तेथे प्रदक्षिणा, धुपारती झाली. दरम्यान विना मंडपात हरिभाऊ बडवे ,केंदूरकर महाराज यांचे वतीने परंपरेने कीर्तन सेवा झाली. कीर्तन त्यानंतर श्रींचे गाभाऱ्यात निमंत्रिताना खिरापत प्रसाद वाटप, विना मंडपात, फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप परंपरेने झाले.
श्रींचा संजीवन समाधी दिन सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्तिकी यात्रा २०२१ अंतर्गत संजीवन समाधी दिन सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत गुरुवारी अलंकापुरी नगरीत साजरा होत आहे. या निमित्त श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा संत नामदेवराय यांचे वंशज परिवारा तर्फे होणार आहे. तत्पूर्वी माउली मंदिरात प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते श्रीना पवमान अभिषेक व दुधारती होईल. संत नामदेवराय यांचे वतीने श्रीना नामदास महाराज परिवाराचे वतीने पूजा होईल. परंपरेने विना मंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे परंपरेने कीर्तन सेवा होईल. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे परंपरेने श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यातील कीर्तन होणार आहे. दरम्यान महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराचे सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्प वर्षाव, आरती व घंटानाद होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप व महानैवेद्याने भाविकांना दर्शन सुरू होईल. सोपानकाका देहूकर यांचे वतीने विना मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांचे वतीने हरिजागर होणार असल्याचे व्यवस्थापक प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.
