शिरूर (हवेलीीनामा ऑनलाइन)
स्वच्छ शिरुर, सुंदर शिरूर व हरीत शिरूरचा ध्यास घेऊन केलेल्या कामामुळे शिरूर नगरपरिषदेने भारत सरकारच्यावतीने राबण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये १ लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटात देशात ९ वा क्रमांक तर पश्चिम भारतातील सहा राज्यांतील शेकडो नगरपरिषदा मधुन ५ वा क्रमांक प्राप्त केल्याने स्वप्नपुर्तीस यश मिळाले असून हा सन्मान शिरुरकरांचा असल्याचे माहिती सांगताना नगराध्यक्षा वैशाली वाखारे म्हणाल्या.यावेळी पेढे वाटून आनंद साजर करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१ अंतर्गत कचरामुक्त शहर व ३ स्टार मानांकन मिळविल्याबद्दल दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करुन शिरुर नगरपरिषदेस गौरविण्यात आले.सदरचा पुरस्कार शिरुर
नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा वाखारे आणि मुख्याधिकारी बोरकर यांनी स्विकारला.याबाबत सोमवार दि.२२ रोजी शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा वाखारे यांनी माहिती सांगतली.
यावेळी मुख्याधिकारी ॲड.प्रसाद बोरकर,स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार,नगरसेवक विजय दुगड,मंगेश खांडरे,नगरसेविका संगीता मल्लाव,ज्योती लोखंडे,रेश्मा लोखंडे,सुरेखा शितोळे, उज्वला वारे, मनिषा कालेवार,स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती सांगताना नगरसेवक विजय दुगड म्हणाले, शिरूरकरांना अभिमान वाटावा असा पुरस्कार नगरपरिषदेला मिळाला असुन शिरुर नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवत शिरुर शहरास ऊघड्यावरील हागणदारी (ODF) मुक्त बाबतचे ODF++ चे मानंकन मिळाले आहे.यापुर्वीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१९ व २०२० अंतर्गत शिरुर शहरास देशात अनुक्रमे ७० वा आणि ३२ वा क्रमांक मिळाला होता.स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१ भारत सरकारचे स्वच्छ भारत अभियान शिरुर शहरामध्ये राबविणेकरीता सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापन (संकलन,विलगीकरण, पुर्नप्रक्रिया) करण्याबरोबर नगरपरिषदेमार्फत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावर शंभर टक्के कचरा प्रक्रिया करण्याचे नियोजन केले.यामध्ये शहरातील दैनंदीन निर्माण होणा-या घनकच-याचे ओला व सुका कचरा विलगीकरण करणे, ओल्या कच-याचे कंपोस्ट खत तयार करणे, सुका कचरा पुर्नप्रक्रिया करण्यासाठी पाठविणे अशा प्रकारची कामे नियमीतपणे केली जात आहेत.तसेच शहरातील सर्व नागरिकांमध्ये स्वच्छतेसाठी जनजागृती केली जाते आणि शिरूरकर नागरिकांचे त्यास सहकार्य व उत्तम प्रतिसाद मिळत असुन शिरूर करांना अभिमान वाटावा असा हा पुरस्कार शिरूर नगरपरिषदेस मिळाला असून सर्वांच्या सहकार्याने अधिक चांगली कामगिरी करून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा मनोदय नगरसेवक विजय दुगड यांनी माहिती सांगिताना व्यक्त केला.
शिरुर शहराच्या या यशामध्ये सभागृह नेते प्रकाश धारिवाल,नगराध्यक्षा वैशाली वाखारे,तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे,स्वच्छता सभापती विठ्ठल पवार,तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता टेकचंद नेमाडे,स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय बर्गे यांसह सर्व नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे मुख्याधिकारी ॲड.प्रसाद बोरकर यांनी सांगितले.
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता सभापती विठ्ठल पवार यांनी हा पुरस्कार प्राप्त होण्यामध्ये शिरुर शहरातील सर्व नागरिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद करून पुढील वर्षी नगरपरिषदेची स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानातील कामगिरी अधिक उत्तम करण्याचा मनोदय बोलून दाखविला.
