राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन) दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही याचा राग मनात धरून स्वतःच्या वयोवृद्ध आईला मारहाण केल्याची घटना घडली पापळवाडी (चास, ता.खेड ) येथे घडली. तर वृद्ध आईला काठीने का मारले असा जाब विचारला म्हणून मोठ्या भावाने लहान भावाच्या छातीवर लोखंडी भाल्याने वार केला.
यात प्रविण लक्ष्मण शिंदे (वय ४०, रा. पापळवाडी चास, ता.खेड ) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना राजगुरुनगर शहराजवळील
चासच्या पापळवाडीत घडली आहे. आरोपी सुनिल लक्ष्मण शिंदे (रा. पापळवाडी चास) याला खेड पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत अटक केली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी आरोपी सुनिल शिंदे हा वृद्ध आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडून सुनिल शिंदे यांने आईला शिवीगाळ करून आईच्या हातापायांवर काठीने मारहाण केली. हा प्रकार भाऊ प्रविण शिंदे याला कळताच आरोपी सुनिल याला, तू आईला का मारहाण केली असा जाब विचारला असता, त्याचा राग मनात धरुन सुनिल याने घरात ठेवलेला साप मारण्याचा लोखंडी भाला आणून प्रविणवर वार केला.
भाला धरण्याचा प्रविण याने प्रयत्न केला. मात्र भाला प्रविणच्या छातीला उजव्या बाजूस खोलवर लागून गंभीर जखम झाली आहे. दरम्यान, वृद्ध आईला देखील ढकलून देऊन त्याने जमिनीवर पाडले. तेवढ्यात भांडणे सोडविण्याकरिता गावातील अक्षय शिंदे, दिपक चव्हाण हे आले ते आल्यानंतर भाऊ सुनिल हा मोटार सायकलवरुन घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपी सुनिल शिंदे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. जखमी प्रविण यांच्यावर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर. एन. काबुगडे करीत आहे.
