किरण खुडे
राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन) राजगुरूनगर शहराजवळील चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरने मित्रांसोबत येऊन कोविड सेंटरमधील वॉर्डबॉयला (कर्मचारी) लाथाबुक्या व लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. डॉ. केशव गुट्टे, (रा. मोशी,ता. हवेली) असे मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव असून, मिथुन मोहन अडसूळ ( रा. नवी सांगवी, पिंपळे गुरव, पुणे) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अडसूळ हा चांडोली ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कार्यरत आहे.
दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत कर्मचाऱ्याच्या हाताचे हाड मोडले आहे. एवढा प्रकार होऊन देखील सहकारी इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये हे प्रकरण जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. तसेच तक्रार दाखल केल्यास नोकरी जाईल, अशी भीती संबंधीत कर्मचाऱ्याला दाखविली. या भीतीपोटी तसेच उपचार सुरू असल्याने हा कर्मचारी गप्प राहीला होता. सोमवारी (दि. १५) खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले करीत आहेत.
शासकीय रुग्णालय असलेल्या चांडोली ग्रामीण रुग्णालयातील इमारतीत, डॉक्टर, कर्मचारी यांच्या राहण्यासाठी प्रशस्त खोल्या व सर्व सुविधा आहेत. उपचारासाठी लागणारी सर्व आधुनिक तंत्रज्ञान व साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. केवळ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची अनास्था, रुग्णांशी, नातेवाईकांशी उर्मट भाषेत बोलणे, यामुळे सर्व सुविधा असूनही नागरीक इकडे फिरकत नाहीत. काम न करणे आणि त्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवून टाळाटाळ करणे असे प्रकार येथे सर्रास व नित्याचे झाले आहे. त्यात दोन महिन्यापूर्वीची ही घटना आता समोर आल्याने पुन्हा एकदा चांडोली ग्रामीण रुग्णालय चर्चेत आले आहे.
