थेऊर हवेलीनामा (ऑनलाइन)अष्टविनायकापैकी पाचव्या क्रमांकाचा असलेला थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती भक्तांच्या सर्व चिंता हरण करणार व मन प्रसन्न करणारा बाल स्वरुपातील ही चिंतामणी गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून पद्मासनात विराजमान आहे.दोन डोळ्यात माणिक व बेंबीत हिरा आहे.
थेऊर हे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले क्षेत्र असून येथे अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत.पुणे शहरापासून केवळ 25 किमी.अंतरावर पुणे सोलापूर महामार्गाशेजारी असलेले हे ठिकाण आहे.भाविक येथे नेहमीच दर्शनासाठी गर्दी करतात परंतु संकष्टी चतुर्थीस आणि विशेषतः अंगारक योगावर दर्शनासाठी येथे मोठी गर्दी असते. गावच्या उत्तरेस यशवंत सहकरी साखर कारखान्याच्या मागच्या बाजूस श्री चिंतामणी गणपतीच्या आई वडिलांची मंदिरे असून ही मंदिरे सुध्दा सुरेख आहेत.भगवान विष्णू व महालक्ष्मी यांना श्री गणेशाचे रुप पाहून आपलाही मुलगा असाच असावा हा मोह झाला त्यावेळी श्री गणेशाने त्यांची ही इच्छा देव लोकी पूर्ण होणार नाही तर भूलोकी श्री चिंतामणी गणपतीच्या रुपाने पूर्ण करण्याचे वरदान दिले.भगवान विष्णूचे माधव हे नाव असलेली मूर्ती ही केवळ थेऊर येथेच दिसून येते.तर सुमेदा च्या रूपाने साक्षात लक्ष्मीने अवतार घेतला आहे या दोघांचा मुलगा श्री चिंतामणी गणपती होय.
थेऊरचे पौराणिक नाव स्थावर क्षेत्र मन स्थिर होण्याचे ठिकाण असा याचा अर्थ.स्वर्गलोकी देवतासह अनेक ऋषी निवास करत त्यापकी असलेल्या कौंडण्य ऋषींचे मन अस्थिर होते त्यावेळी त्यांना स्थावर क्षेत्री येऊन भगवान गणेशाची आराधना केली त्यानंतर त्यांचे मन स्थिर झाले असे हे पवित्र ठिकाण होय गावच्या पश्चिमेला या ऋषींचे निवासस्थान आहे.

श्रीमंत पिशव्यांचा आराध्य दैवत म्हणजे हाच श्री चिंतामणी होय त्यावेळी थेऊर हे राजकीय वर्दळीचे ठिकाण असे.श्रीमंत माधवराव पेशवे यांची या देवांवर अपार श्रद्धा होती.त्यामुळे या देवतेचे आशिर्वाद घेऊनच आपली कामे फत्ते करत असत.त्यांना जेंव्हा दुर्धर आजाराने ग्रासले तेव्हा त्यांनी आपले शेवटचे दिवस येथेच घालवले. श्रीमंत रमाबाई पेशवे या आपल्या पतीसह येथे सती गेल्या. त्यांची ही स्मृती ठिकाण गावच्या पश्चिमेस मुळा मुठा घाटावर आहेत. श्री चिंतामणी गणपती बद्दल अनेक पौराणिक आख्यायिका आहेत.त्यात देवराज इंद्रदेव यांना वापरातून मुक्ती मिळावी यासाठी नारदांनी याच स्थावर ठिकाणी कदंब तिर्थात स्नान करुन गणपतीची आराधना करण्यास सांगितले त्यानंतर गणपती प्रसन्न झाले आणि इंद्र शापातून मुक्त झाला.येथे अस्थिर झालेले चित्त मन स्थिर होते म्हणून या ठिकाणास पौराणिक नांव स्थावर अथवा कदंबवन असे असल्याची माहिती मुद्गल पुराण व गणेश पुराणात आढळते.
तसेच दुसरी एक आख्यायिका आहे ज्यामध्ये देवराज इंद्राने भगवान विष्णूची आराधना केली त्यावर प्रसन्न होऊन विष्णूनी आपल्याकडील चिंतामणी रत्न इंद्रास दिले.एक दिवस इंद्र पृथ्वीवर फिरत असताना कपिल मुनींच्या आश्रमातील दुपारी पोहोचले तेंव्हा दुपारचे भोजन करण्याचा आग्रह त्यांनी इंद्रा केला.जेवन झाल्यावर मृत्यु लोकांत इतके स्वादिष्ट भोजन पाहून इंद्रदेव प्रसन्न झाले त्यांनी आपल्याकडील चिंतामणी रत्न कपिल मुनींनी दिले.पुढे काही दिवसांनी तेथे धुंम्रासूर आपल्या हजारो सैनिकासह कपीलमुनीच्या आश्रमात आला.त्यावर त्यांनाही भोजन करुन जावे अशी विनंती केली परंतू इतक्या लोकांना जेवन कसे मिळणार हा प्रश्न पडला त्यावर त्यांनी चिंतामणी रत्नाबद्दल सांगितले. शेवटी धुंम्रासून याने हे रत्न हिसकाऊन घेतले त्यानंतर कपीलमुनीनी भगवान गणेशाचे आराधना केली.गणेश प्रसन्न झाले व यक्ज्ञातून प्रकट होऊन धुंम्रासूर धुंम्रकेतू व धुंम्रवर्ण या राक्षसाचा वध केला.

महासाधू श्री मोरया गोसावी यांचे गुरू श्री नयनभारतींनी त्यांना आज्ञा केल्या प्रमाणे मोरया गोसावी यांनी थेऊर येथे तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या समाधीनंतर त्यांना ’श्रीचिंतामणी’ देवता प्रसन्न झाली. त्यांनी श्री मोरया गोसावी प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यांना समाधीतून जागे करून ते म्हणाले, “तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. तुझ्या तपाचे फळ म्हणून मी स्वेच्छेने तुझ्या पोटी जन्म घेईन. तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर.”
श्री मोरया गोसावी यांच्या पोटी चिंतामणींनी जन्म घेतला.
त्यांच्या छातीवर शेंदराचा पंजा उमटला होता. त्यांनी जिथे तप केले ती जागा आजही ’मोरयांचे आसन’ म्हणून प्रसिद्ध आहे. तपश्चर्येच्या काळात कसोटीचा एक क्षण आला. जंगलातून एक वाघ आला. श्री मोरया गोसावी महाराजांना पाहून खाण्याकरता वाघाने त्यांच्यावर झडप घातली. झडप घालण्यापूर्वी त्याने भयंकर गर्जना केली. त्याच्या आवाजाने श्री मोरया गोसावी महाराजांनी किंचित् डोळे उघडून वाघाकडे पाहिले. वाघाने झडप घातली पण तो श्री मोरया गोसावी महाराजांच्या स्पर्शाने शिळारूप झाला. अजूनही पाषाण झालेला वाघ थेऊरला पहायला मिळतो. त्या ठिकाणी एक घुमटी बांधण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र थेऊर या क्षेत्राचा स्वामी श्री चिंतामणी आहे. भाविकांच्या मनातील चिंता दूर करण्याचे सामर्थ्य या क्षेत्रामध्ये आहे. म्हणून श्री चिंतामणी हे नाव पडले. श्री चिंतामणीची मूर्ती स्वयंभू आहे. इथे अनुष्ठान केल्यास प्रत्यक्ष श्री चिंतामणी प्रसन्न होतात.
