किरण खुडे
         राजगुरुनगर  (हवेलीनामाऑनलाइन) एस टी प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेची दागिन्यांनी भरलेली पर्स आणि रोख रक्कम बसमध्ये विसरली. परंतु ही सापडलेली बॅग एसटी कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन ती त्या महिलेस परत केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
        राजगुरूनगर एसटी आगाराची नाशिक ते पुणे ही बस नाशिकवरून सुटल्यानंतर शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान शिवाजीनगर (पुणे) येथे पोहोचली. या प्रवासात नाशिक वरून पुण्याला आपल्या नातेवाईकांकडे निघालेल्या ज्येष्ठ महिला प्रवासी शोभा चंद्रकांत बारहाते (वय ६२, रा. वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक ) व त्यांचे पती चंद्रकांत बारहाते यांच्याकडे प्रवासादरम्यान काही इतर बॅगा, पिशव्या आदी साहित्य होते. शिवाजीनगर (वाकडेवाडी) एसटी बसस्थानक येथे गाडीतून उतरताना सर्व बॅगा घेऊन ते गाडीतून उतरले. परंतु खांद्याला अडकवायची लेडीजपर्स मात्र ते बसमध्ये विसरून गेले. हे दोघांच्याही लक्षात आले नाही. शिवाजीनगरला उतरल्यानंतर आपल्या मुलीकडे जाण्यासाठी ते पी एम पी बसने प्रवासाला निघून गेले. या बसच्या प्रवासादरम्यान आपल्याकडे पर्स नसल्याचे शोभा बारहाते यांच्या ध्यानात आले, व ती पर्स नजरचुकीने एसटी बस मधेच विसरली असल्याचे आठवले. तात्काळ तेथील बसमधून उतरून ते पुन्हा वाकडेवाडीच्या एसटी बसस्थानकावर आले. परंतु तोपर्यंत राजगुरुनगर आगाराची बस मार्गस्थ झाली होती. संबंधित बस काही तांत्रिक कामासाठी एसटीच्या दापोडी कार्यशाळा येथे जमा करावयाची होती. याच दरम्यान बसचे वाहक अमित जगताप आणि चालक ज्ञानेश्वर करंडे यांना गाडीत एका लेडीजपर्स विसरल्याचे दिसून आले. पर्स उघडून पाहिली असता त्यात रोख रक्कम व दागिने असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पुन्हा फोन वरून शिवाजीनगर एसटी बस स्थानकावर संपर्क करून संबंधित वाहतूक नियंत्रकाला या पर्सबद्दल कोणी चौकशी करावयास आल्यास आपल्याशी संपर्क करण्याचे सांगितले. तसेच राजगुरूनगर एसटी आगारात वाहतूक निरीक्षक तुकाराम पवळे यांना याबाबतची माहिती दिली. तुकाराम पवळे यांनी संबंधित पर्स व त्यातील ऐवज राजगुरूनगर एसटी आगारात जमा करून घ्यावा, त्यानंतर प्रवासी आल्यावर खात्री पटवून त्यांच्या ताब्यात दिला जाईल. अशी सूचना जगताप यांना केली. त्यानुसार करंडे आणि जगताप हे राजगुरुनगरकडे मार्गस्थ होत असतानाच शिवाजीनगर येथील वाहतूक नियंत्रकांचा फोन आला व संबंधित प्रवासी त्यांच्या पर्सच्या चौकशीसाठी आल्याचे सांगितले. त्यावर जगताप आणि करंडे यांनी त्यांना पाठवून द्या आम्ही बस खडकी पोलिस स्टेशन जवळ थांबवतो असे सांगितले. संबंधित प्रवाशांनी तातडीने दुसऱ्या गाडीने खडकी पोलिस स्टेशन येथे जाऊन करंडे आणि जगताप यांची भेट घेतली. व संबंधित पर्स आमची असल्याचे सांगितले. खडकी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक धवल लोणकर यांच्या समक्ष प्रवाशांची व ऐवजाची खात्री करुन संबंधित पर्स त्या प्रवाशांकडे देण्यात आली. पर्समध्ये गळ्यातील मंगळसूत्र, कानातील वेल, डुल, सोन्याचे मणी असलेली पोत आणि रोख रक्कम तीन हजार रुपये असे पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज  होता. खडकी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी व संबंधित चालक-वाहकांनी त्या प्रवाशांच्या ताब्यात त्यांचा ऐवज दिला. आपला सर्व ऐवज सुखरूप परत मिळाल्याचे पाहून संबंधित महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसेच बक्षीस म्हणून तिने चालक-वाहकांना काही रक्कम देऊ केली परंतु संबंधित एसटी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे ही रक्कम नाकारली व आम्ही आपले कर्तव्य केले एवढी भावना बोलून दाखवली.
      शुक्रवारी सकाळीच पुण्यावरून नाशिककडे जाताना याच गाडीत नाशिक येथे आणखी एका प्रवाशाची बॅग दुपारी विसरल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच या बॅगेत एक डायरी होती. त्या डायरीवरून संबंधित प्रवाशाचा फोन नंबर मिळवून फोन केल्यानंतर प्रवासी परतीच्या प्रवासात नाशिकरोड येथे येऊन संबंधित बॅग घेऊन गेला. त्यानेही दोन्ही कर्मचाऱ्यांचे आभार मानले. एकाच दिवशीच्या प्रवासात दोन अशा घटना घडल्यानंतरही प्रवाशांनी देऊ केलेली रोख रक्कम दोन्ही कर्मचाऱ्यांनी नाकारली, तसेच त्यांनी केलेल्या प्रामाणिकपणामुळे कौतुक होत आहे. राजगुरुनगर एसटी आगारात वाहतूक निरीक्षक तुकाराम पवळे, कामगार संघटनेचे शिवाजी शिंदे, सचिव रमेश वाडेकर, माजी सचिव दत्ता गभाले यांनी करंडे व जगताप यांना सन्मानित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *