वडगाव आनंद (हवेलीनामा प्रतिनिधी) आळेफाटा (ता.जुन्नर) येथे मानवी नात्यांनाही काळिमा फासणारी आणि संपूर्ण जुन्नर तालुक्याला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना आळेखिंड परिसरात उघडकीस आली आहे.एका निर्दयी बापाने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला.या अमानुष प्रकारात साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत सुदैवाने बचावला आहे.या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी आरोपी बापास अटक केली असून परिसरात संताप व्यक्त होत आहे.
हर्षदा सागर शिंदे (वय साडेतीन वर्षे, रा. मोशी, ता. हवेली) असे मृत मुलीचे नाव असून आर्यन सागर शिंदे (वय ५ वर्षे) हा गंभीर अवस्थेतून बचावला आहे. या प्रकरणी सागर सदाशिव शिंदे (वय २९) यास आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सागर शिंदे हा मंगळवारी (दि. ५) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन्ही मुलांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगून मोशी येथील घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो पुणे-नाशिक महामार्गाने नाशिकच्या दिशेने गेला.दिवसभर फिरून रात्रीच्या सुमारास तो जुन्नर तालुक्यातील संतवाडी-आळेखिंड परिसरातील जंगलात पोहोचला.
तेथे त्याने अत्यंत क्रूरपणे दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना जंगलात फेकून दिले.या अमानुष कृत्यात हर्षदाचा जागीच मृत्यू झाला तर आर्यन गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडला होता. घटना घडवून आरोपी रात्रीतून तेथून पसार झाला.
दरम्यान बुधवारी (दि. ६) सकाळी आरोपी पुन्हा मोशी येथील घरी परतला. त्या वेळी त्याच्या आई-वडिलांनी मुलांबाबत विचारणा केली असता त्याने चाकण येथे रूम घेतली असून मुले तेथेच असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर अंघोळ करून तो मुलांचे कपडे घेऊन पुन्हा घराबाहेर पडला.
याच दिवशी सकाळच्या सुमारास जंगलात टाकण्यात आलेला आर्यन शुद्धीवर आला. घाबरलेल्या अवस्थेत तो महामार्गाच्या दिशेने चालत आला आणि रडू लागला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्याला जवळ घेत विचारपूस केली. संबंधित नागरिकांनी वडगाव आनंद व आळे येथील पोलीस पाटलांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाला तातडीने आळेफाटा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव आर्यन सागर शिंदे असे सांगितले तसेच तो मोशी येथील रहिवासी असल्याची माहिती दिली.त्यानुसार पोलिसांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधला.काही वेळातच मुलाचे आजोबा लक्ष्मण शिंदे हे नातेवाईकांसह आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाले.त्यांनी हा आपलाच नातू असल्याचे ओळखले.मात्र हर्षदा दिसत नसल्याने संशय अधिक गडद झाला.
यानंतर आळेफाटा पोलिसांनी मुलगा आणि नातेवाईकांसह भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत आरोपी सागर शिंदे याला चाकण परिसरातून ताब्यात घेतले.पोलिसी चौकशीत त्याने दोन्ही मुलांना आळेखिंड येथील जंगलात गळा दाबून फेकल्याची कबुली दिली.
यानंतर आळेफाटा पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. बुधवारी रात्री उशिरा जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.या शोधादरम्यान हर्षदाचा मृतदेह आढळून आला.हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी आरोपी सागर शिंदे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.
