किरण खुडे,
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने आणि संघटित पद्धतीने काम करण्याची गरज असून शेती क्षेत्रातही गट पद्धतीने काम करण्याचे आवाहन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दावडी ( ता.खेड ) येथे केले.
दावडी ( ता.खेड ) येथे रामसुकृत कल्याण फाऊंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर खेडचे आमदार बाबाजी काळे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील, सदस्या दीप्ती भोगाडे, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेणंद, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घारे, नगरसेवक निलेश गोरे, संचालक दीपक घारे, संचालक संजय घारे, मंगेश सावंत, बाळासाहेब शिंदे, निमगावचे सरपंच अमर शिंदे पाटील, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष गोरडे, फाल्गुनी जपे, सुभाष कळंबकर, सुरेश भुजबळ, डॉ. लक्ष्मीकांत शामसुंदर, संदीप गाडे यांच्यासह गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घारे यांनी प्रास्ताविकात कार्याची माहिती देताना फाऊंडेशन सध्या शिक्षण, कौशल्यविकास, वैद्यकीय शिबिरे आणि शासकीय योजनांसाठी मदत या चार प्रमुख विभागांत काम करत असल्याचे सांगितले. ग्रामीण समाजाला सक्षम, स्वावलंबी आणि संघटित बनविणे हेच फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी भाषणात नमूद केले.
रामसुकृत कल्याण फाऊंडेशन तेजोमय आय केअर फाऊंडेशन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सत्य साई सेवा ट्रस्ट, रेलफोर फाऊंडेशन आणि इतर संस्थांच्या सहकार्याने विविध लोकाभिमुख उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रामसुकृत कल्याण फाऊंडेशन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देणे, युवक-युवतींना कौशल्यविकासाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनवणे, गरजूंसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, तसेच गंभीर आजारांसाठी आणि इतर गरजांसाठी कुटुंबांना शासकीय योजना व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांत कार्य करत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे कौतुक केले.
