अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) पोलीस हे नागरिकांचे प्रतिबिंब असतात. समाज जसा, तसेच पोलीस घडतात. त्यामुळे समाज आणि पोलीस यांची सांगड घालत समन्वयाने नागरिकांचा विश्वास जिंकत लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देण्यावर माझा भर असेल, असा ठाम विश्वास साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला.
बुधवारी त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जवळपास वीस महिन्यांनंतर जिल्ह्याचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे सांगताना त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या समस्या वेगळ्या असतात, याची जाणीव असल्याचे नमूद केले.
माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास टाकत ही जबाबदारी दिली आहे. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे आणि पारदर्शक पद्धतीने काम करणे हे माझे कर्तव्य आहे. हीच अपेक्षा मी माझ्या संपूर्ण सहकारी टीमकडून ठेवतो, असे पिंगळे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, की जिल्ह्यातील नागरिकांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल, त्यांच्या समस्या कशा कमी करता येतील आणि प्रशासन अधिक परिणामकारक कसे बनवता येईल, यावर भर दिला जाईल. जिल्ह्यात शहरी, ग्रामीण आणि जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरी भागात गुन्हेगारीचे वेगळे स्वरूप आहे. त्याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार ठोस धोरण आखत गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. समाज आणि पोलीस यांची सांगड घालत समन्वयाने नागरिकांचा विश्वास मिळवू. निपक्षपातीपणे आणि पारदर्शक, प्रामाणिकपणे मी काम करण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या सहकारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडूनही याच अपेक्षा असतील. यासाठी सर्व सातारकरांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
