किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : मातृभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी ‘वंदे मातरम ‘ ने लाखो भारतीयांना प्रेरणा दिली आणि यापुढेही भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी हे राष्ट्रगान प्रेरणा देत राहील. या गीताची प्रेरणा घेत स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारकांनी दिलेले त्याग, समर्पण देश कधीच विसरू शकणार नाही. त्यांचे योगदान स्मरणात ठेवणे आपले कर्तव्यच आहे. असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी येथे केले.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजगुरुनगर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिवस आणि वंदे मातरम सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाबाजी काळे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, सहसचिव समर नंदा, सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या जन्म आणि पदस्पशनि पावन झालेली राजगुरुनगर आणि येथील माती आपल्याला पदोपदी प्रेरणा देणारी आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखडा हा केवळ मूलभूत सुविधा आणि बांधकामाचा आराखडा नसून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मारक आहे. भारतीयांसाठी ते प्रेरणास्त्रोत, प्रेरणास्थळ आहे, त्यामुळे या आराखड्याकरिता करण्यात येणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मोबदला देताना तो भरीव स्वरूपात देण्यात येईल,
आमदार काळे यांनी आपल्या भाषणात, हुतात्मा राजगुरू स्मारक विकास व त्यामाध्यमातून होणाऱ्या बाधित आराखड्याकरिता भूसंपादन आणि नागरिकांच्या घराचा प्रश्न सोडवावा. तसेच, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखड्याच्या कामांसाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली.
यावेळी मान्यवरांची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमापूर्वी ऐतिहासिक हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ वाडा व स्व. बाळासाहेब आपटे वाडा येथे आशिष शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली.
