किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : वाफगाव (ता. खेड ) गावात समाजकल्याण निधी वाटपाच्या वादातून एका मोलमजूरी करणाऱ्या तरुणाला भर रस्त्यात अडवून सहा जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना वाफगाव येथील पोतडी ओढा येथे घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयीतांचा शोध घेत आहेत. जखमी तरुण अतुल मच्छिंद्र बोऱ्हाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याबाबत खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाफगाव येथील पोतडी ओढ्याजवळून सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास बोऱ्हाडे हे पाण्याचा जार आणण्याकरीता त्यांच्या मोटारसायकलवरून जात असताना सुजल अरुण माघाडे व आर्यन रवी माघाडे व अन्य चार जणांनी (नावे समजू शकली नाहीत) मोटारसायकल अडवून काहीही न बोलता थेट लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी मारत असताना फिर्यादीने माझे काय चुकले, मला का मारता ? ‘ असे विचारले. परंतु ते काहीही बोलत नव्हते. त्यांनी पायांवर, हातांवर , डोक्यात व पाठीत मारहाण करून दुखापत केली आहे. तसेच या मारहाणीत त्यांचा मोबाईल फोन फोडून टाकला.
फिर्यादीचा ओरडण्याचा आवाज ऐकुन गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले. ते पाहून सर्व संशयीतांनी तेथून पोबारा केला. गावातील शुभम थोरात व गोरक्ष कांबळे यांनी फिर्यादीला जखमी अवस्थेत राजगुरूनगर येथील खाजगी रुग्नालयात दाखल केले.
वाफगाव येथे १५ टक्के समाजकल्याण निधी म्हणून दोन लाख साठ हजार रुपये विकासकामांकरीता आला असून हा निधी एका विशिष्ट ठिकाणीच वापरला जावा अशी गावातील एकाची मागणी असून त्यातून त्याने फोनवरून फिर्यादीला याप्रकरणी धमकी दिली होती. त्यातून त्यानेच हा प्रकार घडवून आणल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी संशयीतांचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
