अतुल देशपांडे,

फलटण, (हवेलीनामा प्रतिनिधी) : फलटणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज अनुभवायला मिळाला. वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याने फलटणच्या न्यायलढ्याला नवे बळ मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत झालेल्या या दिमाखदार सोहळ्याने फलटणच्या न्यायप्रवासाला नवे पर्व प्राप्त झाले.

कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे संचालक कोंडे देशमुख व भोसले यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजुरी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.

फलटणकरांना न्यायासाठी साताऱ्याची धाव नाही’ : एन. एम. जाधव*

फलटण वकील संघाचे अध्यक्ष एन. एम. जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात भावनिक शब्दांत संघर्षाची कहाणी मांडली. “फलटण ते सातारा हे ७० ते ८० किलोमीटर अंतर पार करताना अनेक वकील आणि पक्षकारांना अपघातांचा सामना करावा लागला. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास हा नित्याचा झाला होता. आज हे न्यायालय सुरू झाल्याने फलटणकरांचा मोठा भार हलका झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार झाले. आता न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल. मात्र फलटणमधील सर्व न्यायालये एकाच प्रशस्त इमारतीत असावीत, ही आमची अपेक्षा आहे. धर्मादाय कार्यालय व सहकार न्यायालयही येथे सुरू झाले पाहिजे; तेव्हाच जिल्हा निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.”

‘दोन दिवसांत २०४५ प्रकरणे वर्ग’ : जिल्हा प्रमुख न्यायाधीश वाघमारे

जिल्हा प्रमुख न्यायाधीश वाघमारे यांनी सांगितले की, “न्यायालय मंजूर झाल्यानंतर आमच्या न्यायाधीश, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन दिवसांत तब्बल २०४५ प्रकरणे साताऱ्यावरून फलटण येथे वर्ग केली. ही मोठी प्रशासकीय कामगिरी आहे.”

 

त्यांनी नमूद केले की, न्यायालयात ई-सुविधा व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपलब्ध असून उद्यापासून प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. “फलटणच्या वकिलांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे. आता फलटणकरांना फलटणमध्येच न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘कोर्ट सॅल्युटसाठी नाही, न्यायासाठी आहे’ : न्यायमूर्ती संजय देशमुख

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी “आज माहेरी आल्याचा आनंद आहे,” असे सांगत आपल्या साताराशी असलेल्या नात्याची आठवण करून दिली.“न्याय देण्यास उशीर होणे हा आपल्या व्यवस्थेवरील काळा डाग आहे. तो पुसून काढणे आपले कर्तव्य आहे. कोर्ट हे साहेबांना सॅल्युट मारण्यासाठी नसते; ते पक्षकारांसाठी असते,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी हा अन्नदाता असून त्याला न्याय देणे ही पवित्र जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

फलटणच्या उद्घाटनासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उपस्थित राहणे ही अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

फलटणची माणसं सुंदर’ : न्यायमूर्ती राजेश पाटील

न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी प्रथमच फलटणला येत असल्याचे सांगत येथील जनतेचे कौतुक केले. “फलटण हे विशेष ठिकाण आहे. येथे जिल्हा न्यायाधीश आधी आणि सीनियर डिव्हिजन नंतर आले, ही वेगळी बाब आहे. वकिलांनी पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे,” असे त्यांनी आवाहन केले.

आमची माती, आमची माणसं’ : न्यायमूर्ती ए. एन. पानसरे

न्यायमूर्ती ए. एन. पानसरे यांनी फलटणशी असलेले आत्मीय नाते व्यक्त करत “आमची माती, आमची माणसं” असे शब्द उच्चारले. बालपण फलटणमध्ये गेले असल्याचे सांगत त्यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाची आठवण सांगितली.

“सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी पक्षकार व साक्षीदारांना कम्फर्टेबल केले पाहिजे. केसेस जलदगतीने निकाली काढणे हीच खरी सेवा आहे,” असे ते म्हणाले.

‘उद्घाटन केलेले कोर्ट बंद होऊ देऊ नका’ : न्यायमूर्ती नितीन बोरकर

न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी सांगितले की, “जिल्हा न्यायालय फार लांब असणे न्यायदानासाठी योग्य नाही. पक्षकार व साक्षीदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आज फलटणमध्ये कोर्टाची साखळी पूर्ण झाली आहे.”

ते पुढे म्हणाले, “सर्व न्यायालयांत ३० ते ४० वर्षांची प्रकरणे प्रलंबित आहेत. जसे न्यायाधीशांना नियम आहेत तसेच वकिलांनाही असले पाहिजेत. जिथे गरज असेल तिथे नियमांचा काटेकोर वापर झाला पाहिजे. आज उद्घाटन करत असलेले हे कोर्ट कधीही बंद होऊ नये.”

फलटणचे पहिले दिवाणी न्यायाधीश एस. पी. सय्यद यांनी मार्गदर्शनाबद्दल सर्व न्यायमूर्तींचे आभार मानत, “जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून न्यायदान जलद गतीने करण्याचा अथक प्रयत्न करणार,” अशी ग्वाही दिली.

फलटणमध्ये वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेने अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून हा दिवस फलटणच्या स्वाभिमानाचा ठरल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या या नव्या पर्वामुळे फलटणकरांना न्यायाचा दरवाजा आता आपल्या शहरातच उघडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *