किरण खुडे,
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : चांडोली (ता. खेड) येथील टोलनाक्याजवळ दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. दुचाकी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हे मंगळसुत्र हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि १२) पुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली टोलनाक्याजवळ सेवा रस्त्यावर घडली.
ज्योती राजकुमार उबाळे (वय ५२, गृहीणी, रा. चांडोली, ता. खेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आणि त्यांची मैत्रीण राजगुरुनगर येथून बाजारात माल खरेदी करून स्कूटी दुचाकीवर चांडोलीकडे परतत होत्या. त्यावेळी मागून एका लाल रंगाच्या दुचाकी मोटारसायकलवर दोन चोरटे आले. गाडी चालवणारा व्यक्ती अंगाने मजबूत, काळासावळा, निळसर रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातलेला होता. तर त्याच्या मागे बसलेला माणूस सावळ्या रंगाचा, पांढऱ्या पट्टेरी टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला होता. जेव्हा ते स्कूटीच्या शेजारून पुढे गेले, तेव्हा मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने धरून हिसका मारून तोडून घेतले.
त्यानंतर दोघेही लाल रंगाच्या मोटारसायकलवरून (क्रमांक माहित नाही) पुण्याच्या दिशेने पळून गेले. दोन पदरी अडीच तोळे वजनाचे आणि सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे मंगळसुत्र होते. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमध्ये सावध राहून, एकटे फिरताना काळजी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्ती अथवा वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन येथील पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
