अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी)
मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे कॉन्स्टेबल विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव हे सातारा जिल्ह्यातील लोणंद नजीकच्या तरडगाव गावचे रहिवासी होते. जाधव हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर तसेच सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. त्यांचेवर तरडगाव येथे शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप यांचे बद्दल माहिती देताना त्यांचे आतेभाऊ गणेश पवार म्हणाले, की 2009 सालामध्ये कॉन्स्टेबल म्हणून विदिप भरती झाले होते. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी एग्रीकल्चर ची दोन वर्षे पुढे शिकत असताना ते पोलीस भरती झाले आणि 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंगरक्षक म्हणून ते सेवेत रुजू झाले. त्यानंतर 2016 सालापासून ते उपमुख्यमंत्री अजित दादांसोबतच गेली दहा वर्षे सेवा बजावत होते .त्यांना दोन मुले, पत्नी आई वडील असा परिवार आहे . विदिप उर्फ बाळा यांचे शालेय शिक्षण त्यांचे चुलते संजय जाधव यांचे सोबत झाले. विदीप यांचे वडील नायगाव मुंबई येथील शाळेमध्ये कारकून म्हणून नोकरीस होते .तर पत्नी सौ .संध्या या फार्मासिस्ट म्हणून काम पाहतात. मुलगी नेत्रा आठ वर्षाची असून अद्वैक वय चार वर्षाचा आहे.
गेले पाच दिवस विदीप उर्फ बाळा हे आजारी होते, आई कामावर जाऊ नको असे म्हणत असतानाही, मात्र आज बारामती येथे सकाळी अजितदादा यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सभा असल्यामुळे ते घरातून पहाटे पाच वाजता अजितदादांसोबत जाण्यासाठी निघाले अशी माहिती गणेश पवार यांनी दिली .
सकाळी विमानाचा अपघात झाल्याची बातमी त्यांना टीव्हीवर कळल्यानंतर त्यांनी विदिपचे आईला फोन करून या बातमीची खातरजमा केल्यावर संपूर्ण परिवार दुःखाच्या सागरात बुडाला. विदिप उर्फ बाळा यांचे पार्थिवावर रात्री उशिरा तरडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
