बारामती(हवेलीनामाऑनलाइन) आजच्या शिक्षण पद्धतीत बदल व्हायला हवेत. जगाच्या बाजारपेठेत टिकणारे विद्यार्थी घडवायचे असतील तर अनुभवजन्य शिक्षण द्यावे लागेल. केवळ जीवशास्त्र नव्हे तर जीवन शास्त्र शिकवावं लागेल, केवळ चित्रकला नव्हे तर चरित्रकला शिकवावी लागेल आणि त्यासाठी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करता येईल .आज जीवन शिक्षण मागे पडलं व नोकरीसाठी शिक्षण सुरू झालं.येथेच आपली चूक झाली. जीवनशिक्षणात प्रथम स्वतःची ओळख करून दिली पाहिजे. शिक्षणात घोकंपट्टी नको तर आलेल्या संकटातून कसा मार्ग काढायचा, मानसिक भावनेवर कसे नियंत्रण ठेवायचे याचा समावेशही शिक्षणात असला पाहिजे . विद्या प्रतिष्ठान ही संस्था कालसुसंगत असून नव्या बदलांना सामोरे जाणारी संस्था आहे .या संस्थेने शिक्षण क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे .असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त काढले. ते  या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर होत्या. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार मा. युगेन्द्र पवार, मा. किरण गुजर, मा. मंदार सिकची, डॉ. राजीव शहा व रजिस्ट्रार श्रीष कम्बोज, संस्थेतील विविध शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य,   मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी बहुसंख्ये उपस्थित होते.
प्रा.नितीन बानुगडे पुढे आपल्या व्याख्यानात म्हणाले की ,” विद्यार्थ्यांनीही आपली क्षमता ओळखली पाहिजे .उगाच नको त्या क्षेत्रात करियर करण्याची स्पर्धा करु नये. ज्या विषयात रुची आहे त्याच विषयात सखोल संशोधन करून ज्ञान मिळवावे .पालकांनीही आपल्या मुलांकडून इंजिनीयर आणि डॉक्टर बनवण्याचा अट्टाहास धरू नये. शिक्षणात घोकंपट्टी नको .आपण फक्त माहिती देतो ज्ञान देत नाही.” असे सांगून प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल करून जीवनाभिमुख शिक्षण दिले पाहिजे .असे प्रतिपादन त्यांनी केले. सकाळी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडांगणावर प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या गदिमा सभागृहात बानुगडे पाटील यांचे व्याख्यान झाले. यावेळी संस्थेच्या विविध शाळेतील शिक्षक बंधू-भगिनींनी  समयोचित असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी तर  मुख्याध्यापिका जाॅयसी जोसेफ यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *