किरण खुडे

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण राहिल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आंबा बागांमध्ये सध्या मोहर येण्याचा महत्त्वाचा काळ असताना, हवामानातील या बदलाचा मोहरावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते, ढगाळ हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर हा उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक टप्पा मानला जातो. या काळात भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे वातावरण आणि मध्यम तापमान आवश्यक असते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळत असून हवेत आर्द्रता वाढली आहे. परिणामी मोहर गळणे, फुलांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तसेच फळधारणेचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाणकार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही भागांमध्ये मोहोर येऊनही त्याची वाढ खुंटलेली दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे किड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त फवारण्यांचा खर्चही वाढत आहे. आधीच वाढलेल्या खत, औषधे आणि मजुरीच्या किमतीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर यामुळे आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.

कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना हवामानावर लक्ष ठेवून योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला असून गरजेनुसार फवारणी, बागेतील हवा खेळती राहील यासाठी योग्य छाटणी तसेच जमिनीत पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जर येत्या काही आठवड्यांत हवामानात सुधारणा झाली नाही, तर आंब्याच्या एकूण उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर बाजारपेठेलाही बसण्याची शक्यता असून, यंदा आंब्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी सध्या अस्वस्थ असून, निसर्गाच्या लहरीपणावर यंदाचा आंबा हंगाम कितपत यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *