पुणे (हवेलीनामा वृतसमूह) सिंहगड किल्ल्याचा विकास रायगड व शिवनेरी किल्ल्याच्या धर्तीवर व्हावा. तसेच छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली शासन व जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली. ते किल्ले सिंहगड येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या 326 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रमात बोलत होते.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंहगड किल्ल्यावर आयोजित शासकीय कार्यक्रम भक्तीभाव आणि उत्साहात पार पडला. या वेळी सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते महाराजांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपाली कोंडे, पंचायत समिती सदस्या शुभांगी खिरीड, सदस्य युवराज वांजळे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, इतिहास संशोधक नंदकुमार मते, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय घोरपडे, वन अधिकारी बळीराम वायकर, मोडी लिपी अभ्यासक अशोक पाटील, प्रा. देशमुख, नगरसेवक सचिन दोडके, अमित गायकवाड, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच ढमढेरे परिवारासह स्थानिक पदाधिकारी, शिवप्रेमी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलताना काकडे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती असलेल्या राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाच्या कठीण काळात स्वराज्य टिकवण्यासाठी मोठा लढा दिला. त्यांचे निधन 3 मार्च 1700 रोजी सिंहगड किल्ला येथे झाले. त्यानिमित्त दरवर्षी येथे पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जातो.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी “छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून दिली. शिवभक्त व नागरिकांनीही महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. उपस्थितांनी स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देत छत्रपती राजाराम महाराजांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *