किरण खुडे

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजकारणात अनेक घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यातच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पुण्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची त्यांच्याशी झालेली महत्त्वपूर्ण भेट.

अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्यात वराळे येथे होणारी भेट अचानक रद्द झाल्यानंतर पवार यांनी बुट्टे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यातील जिजाई निवासस्थानी बोलावून घेतले. या भेटीत खेड तालुक्यातील रखडलेले रस्ते, घाट रस्त्यांचे रुंदीकरण, भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा, यासह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

यावेळी अजित पवार यांनी, “मी काम करणारा माणूस आहे. पालकमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून विकासकामांसाठी निधी देण्याची जबाबदारी माझी आहे,” असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून समजले आहे.

या भेटीला शरद बुट्टे पाटील यांच्यासह पत्नी सुनीता बुट्टे पाटील, माजी सभापती चांगदेव शिवेकर, दत्तात्रय टेमगिरे, दत्तात्रय व श्रद्धा मांडेकर, संदीप व धनश्री भोकसे यांच्यासह तालुक्यातील काही गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही बुट्टे पाटील यांना पक्षात घेण्यास सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे बुट्टे पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केवळ औपचारिकतेवर येऊन ठेपल्याचे तालुक्यात मानले जात आहे.

या घडामोडींमुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार असून, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार हे निश्चित मानले जात आहे.

 

अकरा वर्षांनंतर पुन्हा ‘ स्वगृही’?

 

१९९९ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या शरद बुट्टे पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती म्हणून काम केले. मात्र २०१४ पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही पवार यांच्याशी त्यांची जवळीक कायम राहिलेली तालुक्याला ज्ञात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग, तसेच जिल्हा परिषद गट-गण रचनेत मिळालेले सहकार्य पाहता, बुट्टे पाटील राष्ट्रवादीत परतणार, या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *