अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वीर धरण(ता. खंडाळा) येथे एक युवक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ३० तासांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह सापडला. विनोद सुरेश गेंडे (वय ३४, मूळ रा. विठ्ठलवाडी, ता. मुळशी. सध्या रा. कोथरूड, पुणे) असे या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आपल्या अपार्टमेंटमधील मित्रांसोबत फिरण्यासाठी तो वीर धरणावर आला होता. विनोद गेंडे हा पोहत पोहत वीर धरण्याच्या मध्यभागी गेला आणि तेथेच तो बुडाला. यानंतर दिवसभर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगडट्रेकर्स आणि शिरवळ व खंडाळा येथील सर्च अॅण्ड रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. अंधार पडल्याने हे शोधकार्य थांबविले. यानंतर गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविली असता तब्बल ३० तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले.
पोलिस आणि नातेवाइकांच्या माहितीनुसार, विनोद अपार्टमेंटमधील एक रिक्षाचालक आणि अपार्टमेंटच्या सुरक्षा गार्ड या मित्रांसोबत वीर धरण परिसरात गेला होता. त्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन करून मृतदेह शिरवळ पोलिसांनी नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
