किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या विशेष मोहिमेअंतर्गत राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी येथे वास्तव्यास असलेला सराईत गुन्हेगार संकेत होले (वय ३१) याला महाराष्ट्र धोकादायक कृत्य प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत एका वर्षासाठी अमरावती येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. अशी माहीती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.

होले याच्यावर यापूर्वी खुनाचा कट रचणे, जबर मारहाण, घरफोडीसह मारहाण आणि नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन दहशत निर्माण करणे, असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा धोकादायक व्यक्ती असल्याने याविषयी खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. अधीक्षकांनी संबंधीत प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये होले याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, खेड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी होले याला ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *