अतुल देशपांडे,

 

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी)

पत्रकारांनी धकाधकीच्या जीवनात स्‍वत:चे आरोग्य सांभाळून नियमित १ तास व्‍यायाम करावा. ह्‍दयविकाराचा धोका सर्वच वयोगटामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी प्रथमोपचार म्‍हणून पत्रकार दिनी पत्रकारांना वैद्यकीयदृष्ट्या ‘सीपीआर’ कसा द्यायचा याचे प्रात्‍यक्षिक सातार्‍यात देण्यात आले. दरम्‍यान, नुकत्‍याच झालेल्‍या साहित्‍य संमेलनाला सातारच्या पत्रकारांनी चार चाँद लावले असे गौरोद्गार पत्रकार व संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी काढले.

पत्रकार दिनानिमित्त मंगळवारी सातारा जिल्‍हा पत्रकार भवनामध्ये आरोग्य शिबीर तसेच पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी ९९वे अ.भा.म.साहित्‍य संमेलन उत्‍कृष्ठरीत्‍या पार पाडल्‍याबद्दल त्‍यांचा विशेष सत्‍कार असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, डॉ.जयेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, हणमंत पाटील प्रमुख उपस्‍थित होते.

डॉ.जयेंद्र जाधव म्‍हणाले, ह्‍दय हा शरीरातील सर्वात महत्‍वाचा भाग आहे. दुर्देवाने गेल्‍या काही वर्षांमध्ये माणसाचे हे ह्‍दय दिवसेंदिवस कुमकुवत होत चालले आहे. पत्रकारांनाही ताणतणावाचा अधिक सामना करावा लागत आहे. यासाठी योग्य ती खबरदारी घेतली तर ह्‍दयविकारापासून निश्चित लांब राहू शकतो. यावेळी त्‍यांनी वैद्यकीयदृष्ट्या ह्‍दयविकाराची इतर माहिती दिली. यानंतर डॉ.कबीर मुलाणी, डॉ.मिलिंद सुर्वे यांनी मानवाचा स्‍टॅच्यू आणून ह्‍दयविकार आल्‍यानंतर पहिल्‍या ४ मिनिटांमध्ये कसा सीपीआर द्यावा, याचे प्रात्‍यक्षिक दिले. पत्रकारांनीही हे प्रात्‍यक्षिक अनुभवले. यावेळी उपस्‍थित पत्रकारांनी डॉक्‍टरांना अनेक प्रश्न केल्‍यानंतर डॉक्‍टरांच्या टीमने त्‍याला उत्तरे दिली.

पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी म्‍हणाले, सातार्‍यातील साहित्‍य संमेलन दिमाखात व न भुतो न भविष्य असे पार पडले. संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला. सातार्‍यातील पत्रकारांनी या संमेलनाला चार चाँद लावत सर्वदूर पोहचवले. हे काम एकट्याचे शक्‍य नाही. त्‍यामुळे सर्वांच्या एकीमुळे, योग्य नियोजनामुळे हे संमेलन पार पडले आहे. सातारचे नगराध्यक्ष यांनीही पालिकेच्यावतीने दिले जाणारे पुरस्‍कार द्यावेत. शाळा प्रवेश दिन देखील पालिकेच्यावतीने साजरा केला जावा, अशा मागण्या केल्‍या.

नगराध्यक्ष अमोल मोहिते मनोगतामध्ये म्‍हणाले, पत्रकारांसाठी जेवढे काही करता येईल ते केले जाईल. पुरस्‍कार तसेच शाळा प्रवेश दिन याबाबत लवकरच निर्णय घेतले जातील अशी ग्वाही देवून तमाम पत्रकारांना त्‍यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्‍या. प्रास्‍ताविकात विठ्ठल हेंद्रे यांनी पत्रकार संघाकडून वर्षभरात राबवलेल्‍या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आणखी असेच कार्यक्रम घेतले जातील अशी ग्वाही दिली. यावेळी सातारा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्ष उमेश बांबरे, संघटक अजित जगताप खजिनदार अमित वाघमारे, अरुण जावळे, मनोज पवार, अजित भिलारे, आदेश खताळ, विनित जवळकर, संजय नलवडे, संजय साबळे, प्रतीक भद्रे, साई सावंत, मीना शिंदे, गौरी आवळे तसेच मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

 

 

 

चौकट

 

आधार हॉस्‍पिटलच्यावतीने मंगळवारी व बुधवार दि. ७ जानेवारी अशी दोन दिवस पत्रकार व त्‍यांच्या कुटुंबियांची मोफत काही मोफत तपासण्या करणार असल्‍याचे सांगून त्‍याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आधार हॉस्‍पिटलमध्ये संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *