किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या भीमाशंकर (ता. खेड) येथे पुणे येथील एका कुटुंबांतील तिघांना सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीत आरोपींमध्ये एक निळा शर्ट आणि काळे जॅकेट घातलेल्या वर्णनाचा व्यक्ती तसेच इतर सात सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. माया हंबीर लंघे (वय ४८, रा. संघर्ष चौक, चंदननगर, पुणे) यांनी याप्रकरणी खेड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून बुधवारी (दि. २४) लंघे कुटुंबीय भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर देवस्थानातील राम मंदिराजवळ त्यांना सुरक्षा रक्षकांकडून होत असलेल्या धक्काबुक्कीबाबत विचारणा केली होती. यावरून संतापलेल्या आरोपींनी माया लंघे तसेच त्यांचे पती हंबीर लंघे आणि मुलगा राजवर्धन यांना हाताने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली, याशिवाय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून फिर्यादींचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडण्यात आला.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपींमध्ये निळा शर्ट व काळे जॅकेट घातलेली, कानात बाळी घातलेली एक व्यक्ती, चार पुरुष सुरक्षारक्षक आणि व तीन महिला सुरक्षारक्षक यांचा समावेश असून, त्यांची पूर्ण नावे आणि माहिती अद्याप उपलब्ध नाही. घटनेच्या वेळी देवस्थान परीसरात भाविकांची मोठी गर्दी होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, संशयीत आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी खाजगी एजंटांनी पैसे उकळल्याचा प्रकार घडला होता. आता भाविकांना थेट मारहाण करण्यापर्यंत व दहशत निर्माण करण्यापर्यंत मजल गेली आहे का ? अशा संतप्त प्रतिक्रिया भाविकांकडून येत आहेत. देवस्थान ट्रस्टकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिस तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *