किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : राजगुरूनगर शहरातील अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून नागरिकांनी शहरात मेणबत्ती मोर्चा काढला.
राजगुरुनगर येथे वास्तव्यास असलेला मृत पुष्कर दिलीप शिंगाडे या इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची खाजगी शिकवणी वर्ग सुरू असताना निघृण व अमानुषपणे हत्या झाल्याची घटना शहराला काळीमा फासणारी असून, शहरातील ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेचे विदारक वास्तव अधोरेखित करणारी आहे. पुष्कर शिंगाडे याला न्याय मिळालाच पाहिजे, ही राजगुरुनगरमधील प्रत्येक नागरिकाची भावना आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता ठोस व कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत यावेळी नागरीकांनी व्यक्त केले.
पुष्कर शिंगाडे यांच्या हत्येतील आरोपीची क्रूरता, निर्दयता व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, त्याला अल्पवयीन म्हणून नव्हे तर प्रौढ आरोपी म्हणून वागणूक देण्यात यावी. या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व जलद गतीने करून आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर कार्यवाही काटेकोरपणे करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरात व परिसरात खुलेआम विक्री होणाऱ्या गांजा, मावा, दारू व इतर अमली पदार्थांवर व अवैध धंद्यावर तात्काळ व कायमस्वरूपी बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, शहरातील प्रत्येक शाळेमध्ये पोलीस प्रशासनामार्फत किमान वर्षातून एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती, कायदे व शिक्षा याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावेत. अल्पवयीन मुलांवर मोटारसायकल चालविण्यास पूर्णतः बंदी घालून कठोर कारवाई करण्यात यावी, आवश्यकता भासल्यास संबंधित पालकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यापूर्वी घडलेल्या दोन मुलींच्या हत्येप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून झालेल्या कारवाईची सविस्तर व अधिकृत माहिती जनतेसमोर मांडण्यात यावी, राजगुरुनगर शहरात बाहेरून येऊन वास्तव्यास असलेल्या सर्व भाडेकरूंची पोलिस तपासणी करून, पोलिस दप्तरी नोंद बंधनकारक करण्यात यावी. या सर्व मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास, राजगुरुनगरवासिय तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या सर्व मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांना यावेळी देण्यात आले.
