किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : मंदोशी (ता. खेड) येथील जावळेवाडीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, यामुळे घराचे छप्पर कोसळले व एकजण गंभीर जखमी झाला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा घरात असलेले आणखी दोन सिलिंडर आगीच्या संपर्कात आले असते तर मोठा अनर्थ घडला असता.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जावळेवाडी येथील शांताबाई सीताराम गोडे यांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी स्फोट झाला. शांताबाई व त्यांचे कुटुंबीय शेजारच्या घराच्या अंगणात बसले होते. त्यावेळी आपल्या घरामधून गॅसचा वास येत असल्याने या बाबत शांताबाई यांचा पुतण्या लहू गोडे हे घरात पाहण्यासाठी गेले. त्याचवेळी मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की घराच्या वरील बाजूचे लोखंडी टी अँगलचे छप्पर व फरशी पूर्णपणे फुटून खाली पडली. त्याच्या वरच्या मजल्यावरील पत्रेही फुटले. वरच्या मजल्यावरील कुटुंब परगावी गेल्यामुळे ते या अपघातातून वाचले मात्र त्यांच्या घरात असलेले भरलेले दोन सिलिंडर आगीच्या संपर्कात आले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत सुरू करून लहू यांना रुग्णालयात दाखल केले. केवळ शांताबाई व त्यांचे कुटुंबीय घराच्या बाहेर असल्यामुळे बचावले. दरम्यान, संबंधित गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी याविषयी संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
