दिपक खिलारे

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी)

इंदापूरचा हरहुन्नरी क्रिकेटपटू एजाज शेखलाल कुरेशी याने पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात आपली दमदार छाप उमटवत देशपातळीवर इंदापूरचे नाव गौरवाने उंचावले आहे. देशातील सर्वांत मोठी टेनिस बॉल क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएसपीएलच्या तिसऱ्या सीझनमध्ये एजाजला तब्बल १६ लाख ५० हजार रुपयांची भव्य बोली लागली असून माझी मुंबई संघाने चुरशीच्या स्पर्धेत बाजी मारत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

‌डावखुरा सलामीचा फलंदाज, तितकाच प्रभावी डावखुरा गोलंदाज आणि मैदानावर चपळ चित्ता अशी एजाज कुरेशीची ओळख. यंदाची स्पर्धा जानेवारी–फेब्रुवारीमध्ये सुरत येथे रंगणार आहे.

यापूर्वी पहिल्या सीझनमध्ये माझी मुंबईने ३ लाख, तर दुसऱ्या सीझनमध्ये बेंगळुरू स्ट्रायकर्सने १० लाख रुपयांची बोली लावून एजाजला आपल्या संघात घेतले होते. सततच्या भक्कम कामगिरीमुळे या तिसऱ्या सीझनमध्ये त्याची किंमत विक्रमी वाढून १६.५ लाखांवर पोहोचली आहे. एजाजला आपल्या तंबूत खेचण्यासाठी टायगर्स ऑफ कोलकत्ता, माझी मुंबई आणि हैदराबाद या संघांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली.

इंदापूरमधील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एजाज कुरेशीने प्लास्टिक बॉलपासून क्रिकेटचा प्रवास सुरू केला. पुढे त्याने देशभरातील प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी साकारली. २०१५ मध्ये दुबईतील १० पीएल स्पर्धेत खेळल्यानंतर त्याचा क्रिकेट प्रवास अधिक वेगाने पुढे गेला.

यानंतर २०१९–२०२० दरम्यान लंडनमध्ये झालेल्या टेनिस विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळण्याचा मान त्याला मिळाला आणि त्या स्पर्धेत भारताने विश्वचषक जिंकला. देशातील सुप्रीमो चषक, रतनबुवा चषक, गोवा एसपीएल, प्रहार चषक, क्रिकोन चषक यांसारख्या नामांकित स्पर्धांमध्ये त्याने आपली भक्कम छाप सोडली. यासह दुबई, सौदी अरेबिया, कुवेत येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही त्याची कामगिरी गाजली आहे.

सध्या एजाज पुण्यात कठोर सराव करत असून फिटनेस, नेट प्रॅक्टिस आणि शारीरिक तयारीवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. कुरेशीच्या या तेजस्वी यशामुळे इंदापूरमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 “माझी मुंबई संघाने मला दिलेली ही सुवर्णसंधी मी नक्कीच सोन्यात परिवर्तित करेन,” – एजाज शेखलाल कुरेशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *