इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी)
इंदापूर तालुक्यातील चेतना कॉलेज ऑफ फार्मसीची गुणवान विद्यार्थिनी कु. आरती आबा कारंडे हिने आपल्या जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्या जोरावर एक नव्हे, तर दोन प्रतिष्ठित शैक्षणिक शिष्यवृत्त्या मिळवून उल्लेखनीय असा मानाचा टप्पा गाठला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने साधलेल्या या यशामुळे इंदापूर तसेच कॉलेजचा मान आणखी वाढला आहे.
अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे आयोजित “शिष्यवृत्ती वाटप २०२५” या राज्यस्तरीय कार्यक्रमात आरती कारंडे हिचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी आयोजित या भव्य सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बीव्हीजी ग्रुपचे डायरेक्टर हणमंतराव गायकवाड, तसेच तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक रवी घाटे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या संदेशांनी व प्रेरणादायी वातावरणात झालेल्या या वितरण समारंभात आरतीस शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
याचबरोबर, शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक परिस्थिती आणि मुलाखतीतील कामगिरी या तीनही निकषांवर आरती करांडे हिची SOCIAL 100 FOUNDATION या पुण्यातील प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठीही निवड झाली आहे. “समाजाकडून समाजासाठी” या ब्रीदवाक्यास अनुसरून कार्य करणाऱ्या या संस्थेच्या निवड प्रक्रियेत आरतीने उत्तम कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले. तिला मुलाखत आणि दस्तऐवज सादरीकरणासाठी धनकवडी येथील के.के. मार्केटमध्ये बोलावण्यात आले होते. सर्व कागदपत्रांची तपासणी आणि प्रत्यक्ष संवादातून आरतीने आपल्या शैक्षणिक प्रवासातील प्रामाणिकता आणि ध्येयदृष्टी स्पष्टपणे मांडत परीक्षकांचा विश्वास जिंकला.
गेल्या काही वर्षांत राज्यात मुलींच्या उच्च शिक्षणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) अंतर्गत व्यावसायिक शिक्षणात मुलींच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण व निम्न आर्थिक स्तरातील गुणी विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती हा आधार ठरत असून त्यांच्या भविष्याच्या मार्गक्रमणाला बळकटी देणारा महत्त्वाचा घटक ठरतो. आरतीच्या या यशामुळे अशा शिष्यवृत्ती उपक्रमांचे महत्व अधोरेखित होते.
आरतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की, “आरतीसारख्या विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षकांनी दिलेले योग्य मार्गदर्शन यांचा संगम म्हणजेच हे यश तसेच तिच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा.”
चेतना फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी आरतीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर कॉलेजच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.
आरती कारंडेच्या कुटुंबियांनीही तिच्या या दुहेरी यशाबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करत, “शिष्यवृत्तीमुळे शिक्षणाची आर्थिक जबाबदारी हलकी झाली असून पुढे आणखी उत्तम शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळाली आहे,” असे सांगितले.
आरतीचे हे यश केवळ तिच्या वैयक्तिक प्रगतीचे प्रतीक नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनी किती मोठ्या संधींचा लाभ घेऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तिच्या आगामी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
