किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : खरपुडी खंडोबा (ता. खेड ) येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा मंदिरात शुक्रवारी (दि ५) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. या घटनेत कुलदैवत खंडोबा, म्हाळसा व बानू देवीच्या मूर्तीवरील चांदीचे दागिने, उत्सव मूर्ती, स्वयंभू पिंडीवरील चांदीचे कवच, देवाची चांदीची पगडी, सहा मोठे चांदीचे हार, बानू-म्हाळसा मुर्तींचे मुकुट, सिंहासनावरील वाघाची मूर्ती असा एकूण सुमारे २१ किलो चांदीचा ऐवज चोरुन नेला. तसेच दानपेटी फोडून त्यातील सुमारे ६० ते ७० हजार रुपये असा एकूण अंदाजे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी मुख्य मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला.
शुक्रवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. गुरुवारी (४ डिसेंबर) रोजी रात्री मंदिर परिसरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही वेळ साधली. पहाटे ५ वाजता देवपूजा करण्यासाठी पुजारी आले असता कुलूप तुटलेले व गाभारा उघडा दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. ही माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांचा तपास लावणे कठीण झाले आहे. चोरीची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी पसरली आहे. सीसीटीव्ही व यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची व चोरीचा तपास तातडीने करण्याची भाविकांनी मागणी केली आहे.
