राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या २१ नगरसेवकपदांसाठी अखेरच्या दिवशी सोमवार (दि. १७) पर्यंत १६८, तर नगराध्यक्षपदासाठी ११ अर्ज असे एकूण १७९ अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची मंगळवारी (दि. १८) छाननी झाली. त्यात नगरसेवकपदाच्या ४ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी एकूण १७५ अर्ज वैध ठरले असल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील यांनी दिली.
मंगळवारी सर्व अर्जांची छाननी झाली. त्यात पक्षाचा अर्ज दाखल केला, मात्र एबी फॉर्म जोडला नसल्याने प्रभाग क्रमांक २, ८ आणि ९ मधील प्रत्येकी एक, तसेच दोन अर्जावर एकच व्यक्ती सूचक झाल्याने प्रभाग क्रमांक ८ मधील एक असे चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. छाननीनंतर एक किंवा अधिक अर्ज दाखल झालेल्या मधून नगरसेवकपदासाठी ९९ जणांचे १६४ अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ६ जणांचे ११ अर्ज वैध ठरले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी वैध ठरलेल्या अर्जात शिवसेना (उबाठा) पक्षाचे बापू थिगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण आहेर, शिवसेना (शिंदे गट) मंगेश गुंडाळ, भाजपाचे शिवाजी मांदळे, ॲड. दीपक थिगळे (अपक्ष) व गणेशकुमार इंगवले (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता शुक्रवारी (दि. २१) माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. याशिवाय अर्ज छाननी अथवा इतर अपील असल्यास मंगळवार (दि.२५) पर्यंत निर्णय होईल. त्यानंतरच अर्ज वैधतेची संख्या निश्चित होणार असल्याचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी सांगितले.
