पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  “ विद्यार्थ्यांनी आयुष्यभर प्रत्येक क्षणी शिकत रहावे, कामाच्या ठिकाणी सृजनात्मकता आणि जीवनात समाज सेवेला प्राथमिकता द्यावी.  तीच  समाजाकडून मिळालेली खरी पदवी आहे.” असे मत जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार, लेखक व वक्ता  डॉ. राम चरण यांनी व्यक्त केले.
          डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या तिसर्‍या बॅचच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा विश्वराजबाग, लोणीकाळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटातील तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती सभागृहात दीक्षांत समारंभ संपन्न झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी  अर्लींगट येथील द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे अध्यक्ष डॉ. विस्ताप एम.कारभारी हे ऑनलाईन उपस्थित होते. तसेच, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, अधिष्ठाता प्रा.शरदचंद्र दराडे पाटील, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर आणि डॉ.सुब्बाराव हे उपस्थित होते.
यावेळी विश्वामोहन सिंग या विद्यार्थ्याला फाउंडर प्रेसिडेंट मेडल आणि स्नेहल ईलाई  हिला एक्जीकेटीव्ह प्रेसिडेंट मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच ७० सुवर्ण, १६ रौप्य आणि १३ रजत पदक देण्यात आले. यावर्षी एकूण ३८७८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
        डॉ.रामचरण म्हणाले,“ जगतील सर्व व्यावसायिकांचे यशस्वीतेचे रहस्य म्हणजे ते सतत शिकत राहतात. रोज रात्री विचार करा उद्या काय शिकायचे आहे. यातून मानसिक आरोग्य सृदुढ होते. शिकण्याची सतत नवी उर्जा मिळते. तसेच आपण जीवनातील खरी पदवी ही कामाच्या ठिकाणी आलेले अनुभव असतात. त्यातून ही सतत शिकत रहावे. प्रत्येक कार्यात सृजनात्मकता कला शिका. कोणतेही कार्य करतांना त्याला न्याय देता आला पाहिजे. तिसरा सर्वात महत्वाचा सल्ला म्हणजे सदैव समाजसेवा करणे. हे सर्व करतांना आत्मविश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे.”
          डॉ.विस्ताप कारभारी म्हणाले,“ जीवनात नवीन काही करण्यासाठी सतत शिकत रहा. तसेच समूहामध्ये कामकरण्याची कला आपल्यामध्ये असायला हवी. आपल्याला जवाबदारी काय असते हे कळायला हवे. जीवनात अनेक अथडळे येतील त्यामुळे त्याचा सामना केल्यानंतरच यश प्राप्त होते.  कठीण परिश्रम, लक्ष्य आणि वेळेचे योग्य नियोजन या गोष्टी सदैव लक्षता ठेवावे. माहिती तंत्रज्ञानाचे जग असल्याने त्यानुसार स्वतःमध्ये बदल करावा.”
         प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,“ जीवनामध्ये शिस्त आणि चारित्र्य महत्वाचे आहे. त्यातूनच आपले जीवन घडते. आपले कर्तव्य काय आहे हे न विसरता आई वडिलांच्या सेवेबरोबरच भारत मातेची सेवा करावी. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी केल्यास नक्कीच समाजोन्नती होईल. तुमच्या योगदानातून २१ व्या शतकात भारत हे ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल व समाजात सुख, समाधान आणि शांती नांदेल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ हे एक आगळेवेगळे विद्यापीठ असून येथे वैश्विक शांतीनिर्मिती लॅबोरिटरी आहे.आज पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी व्यावसायिक जगात पाऊल ठेवतांना भारतमातेसाठी कार्य करा. तसेच शाश्वत विकासासाठी पर्यावरणावर कार्य करावे. विद्यार्थ्यांनी वसाहतवादी मानसिकतेला छेद देऊन कार्य करा. परंतू इंग्रजी भाषा ही जागतिक दर्जाअसल्याने त्यांचा ही अभ्यास करा. आपण ही पदवी घेताना जे ज्ञानअर्जीत केले त्याचा उपयोग समाजासाठी करावा. जीवनात संतुलन खूप महत्वाचे आहे त्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे.  सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पगडी घालून आज पदवी प्रदान करण्यात आली आहे. भारतीय परंपरेचा हा संदेश संपूर्ण जगात पोहचेल.
       प्रभारी कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्ताविक केले.प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *