पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)     प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्‍तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत. तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहूरची रेणुका माता, ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ.

           कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी)
साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी प्रसिद्ध आहे. महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.

बर्‍याच विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाले. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे. देवळाचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. देवालय आकाराने एखाद्या फुलीप्रमाणे आहे. हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दरजा न भरता, एकमेकावर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली आहे. देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.

श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले, त्याला १ लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. गरूड मंडप / सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी मंदिरात २० पुजारी आहेत. दर शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

(साभार :- आदित्य देवता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *