थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) येथील एका कंपनीने उभारलेल्या संरक्षक भिंती मुळे आणि पॉलिहाऊसच्या पाणी व्यवस्थापनाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होतं असून शेतात पीक घेणे दुरापास्त झाले आहे. कंपनीने त्यांच्या शेतीभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे परिसरातील नैसर्गिक पाण्याचा निचरा पूर्णपणे अडला आहे. परिणामी आजूबाजूच्या शेतात व घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यात किमान दहा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे अशा अशायाचे निवेदन प्रथमेश लक्ष्मण काकडे यांनी हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांना दिले आहे.
कंपनीकडून पोलीहाऊसच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे दरवर्षी शेजारील शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना तब्बल ३ महिने शेती पडीक ठेवावी लागते.बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून कंपनीकडून तातडीने उपाययोजना करण्याची आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की यावर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या नुकसानी संदर्भात कंपनीकडे विचारणा केल्यावर त्यांना पोलिसांची भीती दाखवण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.